पुणे : सुतारकाम करताना तरुणाने चुकून खिळा गिळला. नंतर पोटात तीव्र दुखू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत त्याच्या आतड्यात खिळा असल्याचे निदर्शनास आले. या खिळ्यामुळे तरुणाच्या प्रकृतीला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता होती. अखेर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया न करता एंडोस्कोपी प्रक्रियेद्वारे हा खिळा तरुणाच्या शरीरातून यशस्वीपणे बाहेर काढला.

पुण्यातील रहिवासी असलेल्या २० वर्षीय तरुणाकडून सुतारकाम करीत असताना अचानक खिळा गिळला गेला. त्याच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यामुळे त्याला बाणेरमधील मणिपाल रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्या तरुणाची एक्स-रे तपासणी केली. त्यात तरुणाच्या आतड्यात खिळा असल्याचे निष्पन्न झाले. या खिळ्यामुळे आतड्यासह पोटातील इतर अवयवांना गंभीर इजा होण्याचा धोका होता. त्यामुळे त्याच्या शरीरातून खिळा काढणे गरजेचे बनले होते.

हेही वाचा…भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; सात जण जखमी

डॉक्टरांनी या तरुणावर कोणतीही चिरफाड अथवा शस्त्रक्रिया न करता एंडोस्कोपी प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. खिळा गिळल्यानंतर तरुणाने काहीच खाल्लेले नव्हते. त्यामुळे ही प्रक्रिया अधिक सहज बनली. या प्रक्रियेच्या माध्यमातून तरुणाच्या छोट्या आतड्यात असलेला खिळा कोणतीही चिरफाड न करता बाहेर काढला. शरीरातील खिळा काढल्यानंतर तरुणाला काही काळ रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याला रुग्णालयातून त्याच दिवशी घरी सोडण्यात आले. खिळ्यामुळे तरुणाच्या शरीरात अंतर्गत दुखापत झाली आहे का, याची एक्स-रे तपासणी काही दिवसांनी करण्यात आली. त्यात रुग्णाच्या शरीरात अंतर्गत इजा झाली नसल्याचे निष्पन्न झाले.

हेही वाचा…पुणे: जंगली महाराज रस्त्यावरील रेव्हेन्यू काॅलनीत घरफोडी

शरीरात एखादी बाह्य वस्तू गेल्यानंतर धोका निर्माण होतो. विशेषत: धारदार अथवा टोकदार वस्तू असल्यास अंतर्गत रक्तस्राव आणि गंभीर संसर्गाचा धोका असतो. त्यामुळे शरीरात गेलेली बाह्य वस्तू लवकरात लवकर बाहेर काढणे आवश्यक असते. डॉक्टरांच्या पथकाने कोणतीही चिरफाड न करता एंडोस्कोपी प्रक्रियेद्वारे तरुणाने गिळलेला खिळा बाहेर काढला. डॉ. प्रसाद भाटे, पोटविकारतज्ज्ञ, मणिपाल हॉस्पिटल (बाणेर)

Story img Loader