पुणे : भाजपचे नेते आणि उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गेल्या काही महिन्यात दोन वेळा शाई फेकीच्या घटना घडल्या होत्या. या दोन्ही घटनेनंतर ज्या ठिकाणी चंद्रकांत पाटील कार्यक्रमास जातात त्या ठिकाणी अधिकचा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येत असतो, ज्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये.
हेही वाचा >>> ‘काही कोटी लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल,’ मराठा आरक्षणाबाबत चंद्रकांत पाटील यांचे भाष्य
आज फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक महोत्सवाला चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकाराशी संवाद साधत अनेक राजकीय घडामोडींबाबत भूमिका देखील मांडली. दरम्यान अंबेजोगाई येथील ३५ वर्षीय शिवराज मोहन ठाकूर या तरुणाने चंद्रकांत पाटील यांना स्पर्धा परीक्षा देणार्या तरुणांबाबत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. पण तेवढ्यात तू कोण आहेस, पत्रकार नसशील तर बाजूला होण्यास चंद्रकांत पाटील यांनी सांगितले, संबंधित तरुणाची पोलिसांना चौकशी करण्यास सांगितले. पण या प्रकारामुळे चंद्रकांत पाटील यांचे प्रतिक्रिया देतांना लक्ष काहीसे विचलित झाल्याचे पहायला मिळाले. त्यानंतर चंद्रकांत पाटील हे पुढील कार्यक्रमसाठी मार्गस्थ झाले. पोलिसांनी त्या तरुणाची चौकशी करुन त्याला नंतर सोडून दिले.