पिंपरी- चिंचवडमध्ये मित्राने आई आणि बहिणी वरून अश्लील शिव्या दिल्यामुळे त्याच्या गळ्यावर चाकूने वार करून त्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सुरज उर्फ जंजीर कांबळे असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो आणि त्याचे आरोपी मित्र पंकज पाचपिंडे आणि अमरदीप उर्फ लखन जोगदंड असे दारू प्यायला बसले होते. सुरजने दोघांनाही आई आणि बहिणी वरून शिव्या दिल्या तेव्हाच दोघांनी सुरजच्या गळ्यावर धारदार चाकूने वार करून हत्या केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज कांबळे हा सात ऑक्टोबरपासून बेपत्ता होता. वाकड पोलिसात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. सुरजचा शोध कुटुंबीय आणि पोलीस घेत होते. ठीक दहा दिवसांनी त्याचा मृतदेह बावधान येथील एका नाल्यात सापडला, त्याची हत्या झाल्याचं निष्पन्न झालं. वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी तात्काळ टीम तयार करून या गुन्ह्यातील आरोपींना शोधण्यासाठी रवाना केली. तपास सुरू असताना सुरज कांबळे ज्या दिवशी बेपत्ता झाला त्या दिवशी सुरज सोबत पंकज पाचपिंडे आणि अमरदीप जोगदंड हे दारू प्यायला बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

आणखी वाचा-मोठी बातमी! अमली पदार्थ तस्करीचा आरोप असलेल्या ललित पाटीलला तामिळनाडू येथून अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

अमरदीप आणि पंकजचा फोनही बंद येत असल्याने वाकड पोलिसांचा संशय अधिक बळावला आणि त्यांचा शोध सुरू केला. दोघांना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई या शहरातून अटक करण्यात आली. पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर मयत सुरजने दारू प्यायला बसल्यानंतर पंकज आणि अमरदीप ला आई आणि बहिणी वरून अश्लील शिवीगाळ केली. याच रागातून दोघांनी धारदार चाकून गळ्यावर वार करत सुरज ची हत्या केल्याचं मान्य केलं. सुरज चा मृतदेह गोधडीत गुंडाळून तो बावधान येथील नाल्यात टाकून देण्यात आला आणि दोन्ही आरोपी हे त्यांच्या मूळ गावी पळून गेले होते अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young man was killed by his drunken friends kjp 91 mrj