पुणे : समाज माध्यमातील एका मैत्रीविषयक ॲपवर झालेली ओळख मसाज थेरपिस्टला महागात पडली. पोलीस असल्याची बतावणी करुन चोरट्याने त्याच्याकडील २५ हजारांची रोकड लुटून नेल्याची घटना पर्वती पायथा परिसरात नुकतीच घडली.
याबाबत एका तरुणाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, समीर बेगमपुर असे नाव सांगणाऱ्या चोरट्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण मसाज थेरपिस्ट आहे. ते ग्राहकांच्या घरी जाऊन मसाज करतात. ग्राहक सेवा देण्यासाठी ते एका ॲपचा वापर करतात. २५ फेब्रुवारी रोजी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर समीर बेगमपूर असे नाव सांगणाऱ्या चोरट्याने संदेश पाठविला. त्याने मसाज करायचा असल्याची बतावणी केली. त्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास भेटायचे ठरले.
पर्वती पायथा परिसरात आरोपी बेगमपुरेने तरुणाची भेट घेतली. त्याने पोलीस असल्याची बतावणी करुन तरुणाला मारहाण केली. याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची धमकी देऊन तरुणाकडून २५ हजार रुपयांची मागणी केली. तरुणाला दुचाकीवर घेऊन आरोपी बेगमपुरे लक्ष्मीनारायण चित्रपटगृह परिसरात गेला. तरुणाला एका बँकेच्या एटीएममध्ये नेले. तरुणाला धमकावून त्याच्याकडून २५ हजार रुपये घेऊन आरोपी दुचाकीवरुन पसार झाला.
शहरात गेल्या महिनाभरापासून मैत्रीविषयक ॲपवरुन झालेल्या ओळखीतून लुटमारीचे प्रकार वाढीस लागले आहेत. मगरपट्टा भागात एका संगणक अभियंता तरुणाला मारहाण करून लुटण्यात आले होते, तसेच धायरीत एका व्यावासायिकाला बोलावून त्याला मारहाण करण्यात आली होती.