लोकसत्ता प्रतिनिधी
पुंणे : दांडिया खेळताना झालेल्या वादातून तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना सिंहगड रस्ता भागात रात्री घडली.
अक्षय कांबळे (वय २५, रा. धायरी-नऱ्हे रस्ता) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. कांबळेने याबाबत सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय दांडिया खेळण्यासाठी गेला होता. दांडिया खेळताना काठी लागल्याने त्याचा आरोपींशी वाद झाला.
आणखी वाचा-ललित पाटीलच्या अमली पदार्थ व्यवसायात ॲड. प्रज्ञा कांबळे सामील
रात्री अक्षय आणि त्याचा मित्र आदित्य दुचाकीवरुन नऱ्हे-धायरी रस्त्याने निघाले होते. त्या वेळी दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी अक्षय आणि आदित्यला अडवले. त्यांना शिवगाळ करुन मारहाण केली. अक्षयच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून त्याच्यावर शस्त्राने वार करण्यात आले. पसार झालेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक गणेश गोसावी तपास करत आहेत.