लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : मॉरिशसमधील भारतीय वंशाच्या १८ वर्षांच्या तरुणाने अपघाताने अल्कालाइन द्रव पदार्थाचे प्राशन केल्याने त्याच्या अन्ननलिकेला मोठी इजा झाली. त्याची अन्ननलिका आकुंचन पावल्याने त्याला काही खाता-पिता येत नव्हते. त्यामुळे त्याचे वजन वेगाने घटून प्रकृती गंभीर झाली. त्याच्यावर पुण्यातील डॉक्टरांनी अत्याधुनिक पद्धतीने यशस्वी उपचार केले असून, तो आता व्यवस्थितपणे खाऊ-पिऊ लागला आहे.

अल्कलाइन द्रव पदार्थ प्राशन केल्याने या तरुणाची अन्ननलिका आकुंचन पावली होती. त्यामुळे बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सुरुवातीला त्याच्यावर लेप्रोस्कोपिक जेजुनोस्टॉमी केली. या शस्त्रक्रियेमध्ये अन्ननलिकेतून एक नळी छोट्या आतड्यापर्यंत नेण्यात आली. या प्रक्रियेमुळे रुग्णाला पोषक घटक द्रवपदार्थाच्या स्वरूपात दिले जाऊ लागले. त्यातून दोन आठवड्यांत त्याचे पोषण वाढले.

रुग्णाची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याच्यावर गॅस्ट्रिक पुलअपसह थोराको-लेप्रोस्कोपिक एसोफॅगेक्टॉमी करण्यात आली. या शस्त्रक्रियेमध्ये अन्ननलिकेतील बिघाड दुरुस्त केला जातो. यासाठी रुग्णाच्या पोटातील नलिका काढून त्याची गिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी ती अन्ननलिकेच्या जागी वापरली जाते. कमीत कमी चिरफाड होणारी ही प्रक्रिया सर्वसाधारणपणे अन्ननलिकेच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वापरण्यात येते. या रुग्णाच्या प्रकृतीतील गुंतागुंतीमुळे ही प्रक्रिया डॉक्टरांनी केली.

शस्त्रक्रियेनंतर दहा दिवसांत रुग्ण द्रव पदार्थ पिऊ लागला आणि त्याने प्रक्रियेला चांगला प्रतिसाद दिला. त्याची प्रकृती सुधारल्यानंतर त्याला घरी पाठवण्यात आले आहे. तो आता त्याचे दैनंदिन जीवन व्यवस्थितपणे जगत आहे.

अन्ननलिकेला झालेली इजा पाहता रुग्णाची प्रकृती गंभीर होती. अन्ननलिकेशेजारील अनेक महत्त्वाचे अवयव असल्याने खराब भाग काढणे आव्हानात्मक होते. कमीत कमी चिरफाड करून आणि रुग्ण वेगाने बरा होईल, या पद्धतीने उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. गॅस्ट्रिक पुलअपसह थोराको-लॅप्रोस्कोपिक एसोफॅगेक्टोमी प्रक्रियेमुळे रुग्ण लवकरात लवकर अन्न गिळू लागला. -डॉ. अमित पारसनीस, विभागप्रमुख, शल्यचिकित्सा, मणिपाल हॉस्पिटल, बाणेर