लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : चंदननगर भागातील एका लॉजमध्ये तरुणाचा मृतदेह सापडल्याची घटना उघडकीस आली. तरुणाच्या मृत्यूमागचे कारण समजू शकले नाही. त्याला दारू पिण्याचे व्यसन होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
आकाश सुनील साबळे (वय २५, रा. चंदननगर, पुणे-नगर रस्ता) असे मृतावस्थेत सापडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळवडीच्या दिवशी (१४ मार्च) आकाश मित्रांसोबत रंग खेळला. दारू प्याल्यानंतर तो चंदननगर भागातील पठारे मळा परिसरात असलेल्या श्री लॉजमध्ये गेला. आकाशने एटीएममधून पैसे काढले. त्यानंतर त्याने पुन्हा दारू प्यायली. तो दारू प्याल्यानंतर नेहमी लॉजवर जायचा. त्याच्याकडे पैसे असल्याने मित्रांनी त्याच्याकडील पैसे काढून कुटुंबीयांना दिले. त्या वेळी आकाशने अत्यवस्थ वाटत असल्याचे मित्रांना सांगितले होते. त्यानंतर शनिवारी (१५ मार्च) सकाळी त्याचे मित्र लॉजवर गेले. मित्रांनी त्याला झोपेतून जागे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो जागा झाला नाही. त्यानंतर दुपारी पुन्हा त्याचे मित्र लॉजमध्ये आले. त्याने प्रतिसाद दिला नाही. मित्रांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच तो मरण पावल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयाकडे चौकशी केली. मित्रांबाबत संशय नसल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सध्या या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी लॉजच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे, अशी माहिती चंदननगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी दिली.