परदेशात नोकरीच्या आमिषाने तरुणांची साडेदहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी समर्थ पोलिसांकडून एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयुरी श्रीवास्तव असे गुन्हा दाखल केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत श्रीकांत राजू शेलार (वय ३१, रा. नाना पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शेलार परदेशात नोकरीच्या शोधात होते. त्यांनी संकेतस्थळावर परदेशातील नोकरीविषयक संधीची जाहिरात पाहिली होती. त्यानंतर त्यांनी मयुरी श्रीवास्तवच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. श्रीवास्तवने पोलंडमध्ये नोकरीची संधी असल्याची बतावणी केली. तेथील व्हिस्सा तसेच अन्य बाबींची पूर्तता करण्यासाठी पैसे भरावे लागतील, असे तिने शेलार यांना सांगितले.
त्यानंतर शेलार यांनी तिला ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठविले. पैसे पाठविल्यानंतर नोकरी न मिळाल्याने शेलार यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. शेलार यांच्यासह नऊ ते दहा तरुणांची फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे तपास करत आहेत.