पुणे : मानसिक आरोग्याच्या समस्येचा गंभीर सामना तरुणांना करावा लागत आहे. मानसिक तणावाचे प्रमाण १८ ते २५ वयोगटातील तरुणांमध्ये सर्वाधिक आहे, असा निष्कर्ष मुक्ता चॅरिटेबल फाउंडेशनच्या आरोग्य हेल्पलाइनच्या ताज्या अहवालातून समोर आला आहे. दरम्यान, मानसिक आरोग्याबाबत मदत घेण्याचे प्रमाण पुरुषांकडून वाढल्याचे निरीक्षणही या अहवालात नोंदविण्यात आले आहे.

मुक्ता चॅरिटेबल फाउंडेशनच्या अहवालानुसार, तरुणांमध्ये ताणतणाव, मानसिक आरोग्याच्या समस्यांबाबत मदत घेण्याचा सकारात्मक बदल तरुण पिढीत दिसून येत आहे. नैराश्य आणि भावनिक अडचणींवर मदत घेण्याची प्रवृत्ती वाढत आहे. विशेषतः पुरुषांनी आणि त्यातही तरुणांनी या दिशेने सकारात्मक पावले उचलली आहेत. हेल्पलाइनवरील ५८ टक्के कॉल हे पुरुषांकडून आलेले आहेत. समाजात मानसिक आरोग्य समस्यांविषयी व्यक्त होण्याचे प्रमाण पुरुषांमध्ये वाढल्याचे हे निदर्शक आहे.

हेही वाचा…पुण्यात फुटपाथवर झोपलेल्या तिघांना मद्यधुंद डंपर चालकांने चिरडले,तर सहा जण जखमी

मानसिक आरोग्याबाबत मदत घेण्याचे प्रमाण पुरुषांमध्ये पूर्वी अत्यल्प होते. पारंपरिक सामाजिक दृष्टिकोनामुळे पुरुषांना त्यांच्या भावनिक समस्या मोकळेपणाने मांडण्यात अडचण येत असे. आता हा कल हळूहळू बदलत असून, पुरुष या मानसिक समस्यांवर मदत मागण्यासाठी पुढे येत आहेत. याच वेळी महिलाही मानसिक आरोग्यासाठी तितक्याच प्रमाणात मदत घेत आहेत. हेल्पलाइनवर आलेले ३८ टक्के कॉल महिलांचे आहेत. याशिवाय, पारलिंगी गटातील व्यक्तींचे कॉलही वाढले आहेत. हेल्पलाइनवर आलेल्या कॉलमध्ये कुटुंबीयांशी असलेल्या तणावपूर्ण नात्यांपासून ते आत्महत्येसारख्या गंभीर विचारांपर्यंत विविध स्वरूपाच्या समस्या उघडकीस आल्या आहेत. ‘मुक्ता हेल्पलाइन’ने या प्रकरणांमध्ये तातडीची मदत आणि भावनिक आधार देण्याचे काम केले आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

शिक्षण, करिअरचा ताण

या अहवालानुसार, १८ ते २५ वयोगटातील तरुणांमध्ये मानसिक आरोग्य समस्या वाढत आहेत. या वयोगटातील तरुणांचे ३६ टक्के कॉल हे शैक्षणिक ताण, करिअरविषयक चिंता आणि नातेसंबंधांतील तणावाशी निगडित आहेत. यामुळे हे तरुण हेल्पलाइनचा आधार घेत आहेत. या वयात निर्माण होणारे ताणतणाव आणि भावनिक अडचणी मोठ्या मानसिक समस्यांचे स्वरूप घेऊ शकतात, त्यामुळे या समस्यांवर वेळीच लक्ष देण्याची गरज आहे, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा…मध्यभागात बनावट नोटांचा मोठा साठा जप्त; गुजरातमधील तरुण गजाआड; पाेलिसांकडून सखोल तपास सुरू

मदतीसाठी संपर्क साधा…

मुक्ता चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून सोमवार ते शनिवार दुपारी १२ ते रात्री ८ या वेळेत क्रमांक ०७८८७८८९८८८२ येथे मानसिक आरोग्य हेल्पलाइनद्वारे मोफत सेवा दिली जात आहे. समाजात मानसिक आरोग्याबाबत सकारात्मक बदल होत असून, विशेषतः पुरुष मदत मागण्याची तयारी दाखवत आहेत, ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र, मानसिक आरोग्यावरचा कलंक पूर्णतः दूर करण्यासाठी अजून बरेच काम बाकी आहे. डॉ. रूपा अग्रवाल सचिव, मुक्ता चॅरिटेबल फाउंडेशन

Story img Loader