पुणे : सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने दागिने चोरणाऱ्या तरुणीसह साथीदाराला लष्कर पोलिसांनी गजाआड केले. चोरट्यांनी पुणे, मुंबई, ठाणे, सातारा तसेच सिंधुदुर्ग परिसरातील सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.
शेखर हेमराज वाणी (वय ३२ रा. मांजरी, हडपसर), शिवानी दिलीप साळुंखे (वय २४, रा. केशवनगर, मुंढवा, मूळ रा. अकलूज. जि.सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. लष्कर भागातील एका सराफी पेढीत ३१ ऑक्टोबर रोजी खरेदीच्या बहाण्याने शिरलेल्या तरुणीने दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तरुणीसह साथीदाराने खरेदीचा बहाणा करुन सराफी पेढीतून दागिने चोरल्याचे तपासात उघडकीस आले. त्यानंतर पसार झालेल्या दोघांचा शोध सुरू करण्यात आला.
हेही वाचा – “अजित पवार मुख्यमंत्री झालेच पाहिजेत”, अभिनेते भाऊ कदम यांना विश्वास, आणखी काय म्हणाले?
हेही वाचा – पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने २६ लाखांची फसवणूक
सराफी पेढीत चोरी करणारी तरुणी आणि साथीदार दुचाकीवरुन मुंढव्याकडे पसार झाले. पोलिसांनी दोघांचा शोध घेऊन त्यांना अटक केली. आरोपी शेखर, त्यांची साथीदार शिवानी यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, ठाणे, सातारा, तसेच सिंधुदुर्ग परिसरातील सराफी पेढीत चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले. चोरट्यांनी नऊ गुन्हे केले आहे. पोलीस उपायुक्त स्मार्तन पाटील, सहायक आयुक्त दीपक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, सहायक निरीक्षक विशाल दांडगे, महेश कदम, संदीप उर्किडे, सोमनाथ बनसाेडे, रमेश चौधर, सचिन मांजरे यांनी ही कामगिरी केली.