लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : छेडछाडीमुळे एका तरुणीने किटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना कोंढवा भागात घडली. तरुणीला त्रास देऊन तिला आत्महत्येचा प्रयत्न करण्यास भाग पाडणाऱ्या तरुणाविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याबाबत एका २० वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण तिचा पाठलाग करुन त्रास देत होता. माझ्याशी विवाह न केल्यास अपहरण करेल, तसेच तुझी छायाचित्रे समाज माध्यमात प्रसारित करुन बदनामी करेल, अशी धमकी आरोपी तरुणाने दिली होती. आरोपीच्या त्रासामुळे घरी किटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तरुणीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलिसांना याबाबतची माहिती रुग्णालयाने दिली. त्यानंतर पोलीस रुग्णालयात पोहोचले. त्यांनी तरुणीचा जबाब नोंदविला. त्यानंतर आरोपी तरुणाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक सचिन थोरात तपास करत आहेत.

शाळकरी मुलीचा विनयभंग

चंदननगर भागात शाळकरी मुलीचा पाठलाग करुन तिचा विनयभंग करणाऱ्या एका तरुणाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तक्रारदार मुलगी शाळेत जाताना आरोपी तरुण तिचा दुचाकीवरुन पाठलाग करायचा. तिच्याकडे मोबाइल क्रमांकाची मागणी करुन त्याने तिला त्रास दिला. मुलीने याबाबत तिच्या भावाकडे तक्रार दिली. तेव्हा आरोपीने भावाला धणकावून मारहाण केली. चंदननगर पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

बदनामीकारक मजकुरामुळे तरुणाीचा विवाह मोडला

बदनामीकारक पत्रके वाटल्याने तरुणीचा विवाह मोडल्याची घटना उघडकीस आली. आरोपींनी बदनामी थांबविण्यासाठी तरुणीकडे १५ लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास समाज माध्यचमात अश्लील छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी दिली. याबाबत तरुणीच्या भावाने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी आरोपी तरुणासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Story img Loader