पुणे : एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी कात्रज चौकात घडली. तरुणीने हेल्मेट परिधान केले होते. मात्र, तिने हेल्मेटचा पट्टा लावला नव्हता. अपघातानंतर तिच्या डोक्यातील हेल्मेट उडून पडले होते. हेल्मेट परिधान करूनही ती वाचली नाही, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
श्वेता चंद्रकांत लिमकर (वय २५, रा. कागल, जि. कोल्हापूर ) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणीचे नाव आहे. श्वेता खेड शिवापूर भागातील एका कंपनीत नोकरीस होती. कामावरून ती घरी निघाली होती. कात्रज चौकात सायंकाळी दुचाकीस्वार श्वेताला महाबळेश्वर-पुणे या मार्गावरील एसटी बसने धडक दिली. दुचाकीस्वार श्वेताचा तोल गेला. ती रस्त्यात पडली. त्यावेळी तेथून सांगली-स्वारगेट या मार्गावरील एसटी बस निघाली होती. या बसच्या चाकाखाली सापडल्याने तिचा मृत्यू झाला. श्वेताने हेल्मेट परिधान केले होते. मात्र, तिने हेल्मेटचा पट्टा लावला नव्हता. अपघातानंतर तिच्या डोक्यातील हेल्मेट उडून पडले होते. हेल्मेट परिधान करून ती वाचली नाही, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर कात्रज चौकात कोंडी झाली होती. पोलिसांनी एसटीचालकाला ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
हेही वाचा…‘पुरंदरमधील विमानतळ मूळ जागेवरच’
कात्रज-कोंढवा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. दोन दिवसांपूर्वी पीएमपी बस दुरूस्तीसाठी गेलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा दोन बसमध्ये सापडून मृत्यू झाला होता. शहरात गंभीर स्वरूपाच्या अपघातात वाढ झाली आहे. कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातानंतर शहरात वेगवेगळ्या अपघातांत २० जणांचा अपघाती मृत्यू झाला. भरधाव वेग आणि बेजबाबदारपणामुळे गंभीर स्वरुपाच्या अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.