पुणे : वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच कथक नृत्याची आवड जोपासणाऱ्या एका विद्यार्थिनीला अचानक अपस्माराचे झटके येऊ लागले. दिवसाला सुमारे ४० झटके एवढे हे प्रमाण वाढले. त्यामुळे तिची प्रकृती ढासळून तिला व्हेटिंलेटरवर ठेवावे लागले. अखेर योग्य वैद्यकीय उपचारांच्या सहाय्याने तिने या विकारावर मात केली आहे. आता ती पुन्हा नृत्य करू लागली आहे.

सांगलीतील २२ वर्षीय विद्यार्थिनीला सामान्य विषाणूजन्य ताप संसर्ग झाला होता. त्यानंतर तिला अचानक अपस्माराचे झटके येऊ लागले. तिच्या झटक्यांचे प्रमाण वाढून तिची प्रकृती ढासळत गेली. तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. ती उपचारांना काहीही प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे तिची प्रकृती आणखी बिघडली. अखेरीस नातेवाइकांनी तिला पुण्यातील नगर रस्त्यावरील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले.

हेही वाचा – फिजिक्स ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाची दमदार कामगिरी, ‘इतक्या’ पदकांवर कोरले नाव

सह्याद्री हॉस्पिटलमधील मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. नसली इच्छापोरिया यांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरू झाले. तिला ‘फीब्राइल इन्फेक्शन रिलेटेड-एपिलेप्सी सिंड्रोम’चे निदान झाले. हा दुर्मीळ मेंदूविकार आहे. सतत येणारे आणि गंभीर स्वरूपाचे अपस्माराचे झटके हे या आजाराचे मुख्य लक्षण आहे. अनेकदा या आजाराचे निदान होणे अवघड असल्याने या विकारामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही जास्त आहे. तरुणीवर इम्युनोग्लोबुलिन, हाय-डोस अँटीकॉनव्हल्संट्स आणि ॲनेस्थेटिक एजंटने उपचार करण्यात आले. तिची प्रकृती सुधारण्यास चार आठवड्यांचा कालावधी लागला. योग्य वैद्यकीय उपचाराद्वारे ती बरी झाली. ती आता चालू लागली असून, पुन्हा नृत्यही करू लागली आहे.

या अनुभवामुळे माझे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. माझी डॉक्टर बनण्याची इच्छा आणखी तीव्र झाली आहे. जीवनातील प्रत्येक क्षण भरभरून जगणे मी शिकले आहे. रुग्णालयातील कक्ष असो किंवा नृत्य मंच, यापुढील प्रत्येक पाऊल माझ्यासाठी अधिक अर्थपूर्ण असणार आहे. – रुग्ण तरुणी

हेही वाचा – Raj Thackeray : “एक मांजर, दूध पिणारे उंदीर अन्…”, राज ठाकरेंनी सांगितली महाराष्ट्राची अवस्था!

अतिशय गंभीर अशा आजाराशी त्या मुलीने दिलेला लढा आणि स्वतःच्या पायावर उभी राहण्याची तिची जिद्द पाहून आम्ही भारावून गेलो. आता तिला इतके सुंदर नृत्य करताना पाहून कोणालाच विश्वास बसणार नाही की, तिने एका जीवघेण्या आजारावर मात केली आहे. – डॉ. नसली इच्छापोरिया, मेंदूविकारतज्ज्ञ