लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : विमाननगर भागात एका उपाहारगृहात पार्टी करुन घरी निघालेल्या तरुणीला घरी सोडण्याचा बहाणा करुन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे.

दत्तात्रय खरात (वय २८, रा. विमाननगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका ३२ वर्षीय तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर भागात बॅकयार्ड कॅफे आहे. तरुणी, तिची मैत्रीण, दोन मित्र गुरुवारी रात्री पार्टी करण्यासाठी तेथे गेले होते. उपाहारगृहात दहा हजार रुपयांचे बिल झाले. तरुणीने डेबिट कार्डद्वारे बिल अदा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, डेबिट कार्डच्या सांकेतिक शब्दात चूक झाल्याने बिल अदा होऊ शकले नाही. त्यानंतर उपाहारगृहातील व्यवस्थापक आणि कामगारांनी तरुणीला शिवीगाळ करुन दोन मोबाइल संच, पॅनकार्ड, आधारकार्ड, डेबीट कार्ड ताब्यात घेतले. बिल भरल्यानंतर जप्त केलेल्या वस्तू परत करेल, असे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा-सिंहगड रस्त्यावर उपाहारगृहचालकाचा खून; वैमनस्यातून खून झाल्याचा संशय

त्यानंतर तरुणी उपाहारगृहात थांबली. त्यावेळी उपाहारगृहातील एका ग्राहक तरुणाने तरुणीला मदत करण्याचा बहाणा केला. तरुणीला घरी सोडण्याचा बहाणा करुन खराडी भागातील एका हॉटेलमध्ये नेऊन तरुणीवर त्याने बलात्कार केला. तरुणीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. आरोपी खरात याला अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young woman was raped by man who pretext of helping her pune print news rbk 25 mrj