पुणे : पबमध्ये नृत्य करणाऱ्या तरुणीना धक्का देणाऱ्या दोघांविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तरुणींना धक्का दिल्यानंतर त्यांना जाब विचारणाऱ्या बाऊन्सर महिलेला शिवीगाळ करण्यात आल्याची घटना येरवडा भागातील एका माॅलमध्ये असलेल्या पबमध्ये घडली.
याप्रकरणी दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघे जण शिरुर तालुक्यातील आहेत. याबाबत महिला बाऊन्सरने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना येरवड्यातील एका माॅलमध्ये असलेल्या पबमध्ये शनिवारी रात्री घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवड्यातील पबमध्ये शनिवारी रात्री तरुणी नृत्य करत होते. आरोपी पबमधील डान्सफ्लोअरवर नृत्य करत होते. त्या वेळी दोघांनी तरुणीला धक्का दिला. हा प्रकार पाहून पबमधील महिला बाऊन्सरने दोघांना बाजूला नृत्य करण्यास सांगितले. त्यानंतर आरोपींनी महिला बाऊन्सरला शिवीगाळ करुन विनयभंग केला. दोघांविरुद्ध पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावली असून सहायक पोलीस निरीक्षक विशाल टकले तपास करत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्रकुमार शेळके, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे.
महिलेला मारहाण करुन अश्लील छायाचित्रे पाठविली
एका महिलेला मारहाण करुन तिच्या बहिणीच्या मोबाइल क्रमांकावर अश्लील छायाचित्रे पाठविणाऱ्या एकाविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. माहिती-तंत्रज्ञान कायदा, तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्याान्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीने आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत एका महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अश्विनी ननावरे तपास करत आहेत.
अश्लील संभाषण प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा
महिलेचा माेबाइल क्रमांक मिळवून तिच्याशी अश्लील संभाषण केल्याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी एकाविरुद्ध गु्न्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या घराशेजारी आरोपी राहायला आहे. त्याने महिलेचा मोबाइल क्रमांक मिळविला. त्यानंतर त्याने महिलेच्या मोबाइल क्रमांकावर वेळोवेळी संपर्क साधून तिच्याशी अश्लील संभाषण केले. गेल्या नऊ महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. आरोपीच्या त्रासामुळे अखेर महिलेने पोलिसंकडे तक्रार दिली. त्यानंतर विनयभंग, तसेच अश्लील संभाषण केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक दिलीप पालवे तपास करत आहेत.