आपल्यासोबत राहण्यास नकार देणाऱ्या प्रेयसीच्या अडीच वर्षांच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या तरूणास चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. या अपहरण झालेल्या मुलीची सुटका करण्यात आली आहे.
विनायक मारूती माने (वय २२, रा. बदलापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अपहरण झालेल्या मुलीच्या आईने तक्रार दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माने व संबंधित तक्रारदार तरूणीचे प्रेमसंबंध होते. पण त्या तरुणीचा दुसऱ्या तरूणाशी विवाह झाला. पण, तक्रार तरूणीच्या पतीला हे समजले. त्यामुळे तरुणी माहेरी राहत होती. काही दिवसांपूर्वी ती चिंचवडला बहिणीकडे आली असता माने हा त्या ठिकाणी आला. तिला आपण सोबत राहू असे म्हणू लागला. तिने नकार दिल्यामुळे त्याने रविवारी सकाळी तिच्या अडीच वर्षांच्या मुलीचे अपहरण केले. याबाबत तिने चिंचवड पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर मानेचा शोध सुरू होता. तो ठाणे येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन मुलीची सकाळी सुटका करण्यात आली. याप्रकरणी चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत.

Story img Loader