लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून, साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ओंकार शाहूराज जाधव (वय २५, रा. प्रतिभा निवास, बिबवेवाडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी आदित्य कांबळे (रा. वैभव सोसायटी, कॅनरा बँकेजवळ, बिबवेवाडी) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याबरोबर असलेले साथीदार देवेन पवार (रा. गॅस गोदामाजवळ, बिबवेवाडी), मेहुल धोखा (रा. गोकुळनगर, कात्रज) यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाधव याने याबाबत बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार जाधव गुरुवारी रात्री त्याचा मित्र विजय चौहान याच्या दुचाकीवरुन निघाला होता. जाधव आणि पवार यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. जाधवने पवारला शिवीगाळ केल्याने तो चिडळा होता. बिबवेवाडीतील महेश सोसायटीसमोर आरोपी पवार आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी जाधव याच्यावर कोयत्याने वार केले.

गंभीर जखमी झालेल्या जाधवला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा आरोपी पवार आणि साथीदार धोखा हे खासगी रुग्णलायात गेले. पोलिसांकडे तक्रार करु नको. उपचाराचा खर्च करतो, अशी धमकी त्याला दिली. पोलीस उपनिरीक्षक साळुंखे तपास करत आहेत.

उपाहारागृहाच्या परिसरात दहशत

उपाहारृहाच्या परिसरात टोळक्याने दहशत माजवून एका तरुणाच्या डोक्यात कुंडी मारुन खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना हडपसर भागात घडली. फैसुद्दीन ईस्माइल बागवान (वय २६, रा. महात्मा गांधी वसाहत, पांढरे मळा, हडपसर) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पौर्णिमा उर्फ दीदी ओव्हाळ (वय २५), कुणाल उर्फ के. डी. , भुगेश यांच्यासह चार ते पाच साथीदारांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बागवान याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बागवान आणि त्याचा मित्र गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हडपसर भागातील स्वाद हॉटेलजवळील चायनीज खाद्यपदार्थाच्या गाडीवर गेले होते. त्या वेळी आरोपी ओव्हाळ आणि साथीदार तेथे आले. त्यांनी तेथील कुंड्यांची तोडफोड केली. बागवान याला बेदम मारहाण केली. त्याच्या डोक्यात कुंडी, तसेच सिमेंटचा गट्टू मारुन जखमी झाले. उपाहारगृहाच्या परिसरात खुर्च्यांची तोडफोड करुन दहशत माजविली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे तपास करत आहेत.