पिस्तूल बाळगणाऱ्या एका युवकास गुन्हे शाखेने सिंहगड रस्ता परिसरात पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतुस जप्त करण्यात आले. ऋषीकेश लक्ष्मण शिंदे (वय १९, रा. साईनगर, हिंगणे खुर्द, सिंहगड रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
हेही वाचा >>> पुणे: बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया उद्यापासून
सिंहगड रस्ता परिसरात थांबलेल्या एका तरुणाकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलीस कर्मचारी श्रीकांत दगडे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून शिंदेला पकडले. त्याच्याकडून पिस्तूल, एक काडतुस आणि एक मॅगझीन जप्त करण्यात आले. चौकशीत शिंदेने धायरीतील मित्र ओंकार लोहकरे याच्याकडून पिस्तूल विकत घेतल्याची कबुली दिली. पोलिसांनी लोहकरे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शिंदेने पिस्तूल कशासाठी बाळगले होते, याचा तपास करण्यात येत आहे.
दरोडा आणि वाहन चोरी प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी, नरेंद्र पाटील, श्रीकांत दगडे, महेश पाटील, रवींद्र लोखंडे, बाळू गायकवाड, नारायण बनकर आदींनी ही कारवाई केली.