पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) कर्मचारी तरुणाची ५७ लाख २२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.
याबाबत एका तरुणाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत कर्मचारी आहे. चोरट्यांनी तरुणाला शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखविले होते. चोरट्यांनी तरुणाला संदेश पाठवून जाळ्यात ओढले. तरुणाला एका समाजमाध्यमातील समुहात सदस्य करुन घेतले. तरुणाने सुरुवातीला थोडी रक्कम गुंतविली. त्यानंतर चोरट्यांनी त्याला परताव्यापोटी अडीच लाख रुपये दिले. त्यामुळे तरुणाचा विश्वास बसला.
हेही वाचा…पुणे : महाविद्यालयाच्या वसतीगृहात तरुणावर ॲसिडसदृश रसायन फेकले
चोरट्यांनी तरुणाला आणखी रक्कम गुंतविण्यास सांगितले. तरुणाने वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने चोरट्यांच्या खात्यात ५७ लाख २२ हजार रुपये जमा केले. पैसे जमा करण्यात आल्यानंतर त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख तपास करत आहेत.