पुणे : बेकायदा सावकारी करणाऱ्या एकाच्या त्रासामुळे तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या तरुणाच्या पत्नीचे सावकारासोबत अनैतिक संबंध होते. अनैतिक संबंध, तसेच सावकाराच्या त्रासामुळे तरुणाने आत्महत्या केल्याची फिर्याद दाखल झाल्यानंतर सावकारासह तरुणाच्या पत्नीलाही अटक करण्यात आली.
सचिन सतीश गिरी (वय ३७ रा. सिद्धीविनायक विहार, हांडेवाडी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी रवींद्र मारूती मेमाणे (वय ४५ रा. सत्यनारायण कॉलनी, फुरसुंगी) आणि गिरी यांची पत्नी कोमल (वय ३०) यांना अटक करण्यात आली. याबाबत सचिन गिरी यांची बहीण सविता संतोष भारती (वय ३९, रा. उरळी देवाची,हडपसर-सासवड रस्ता) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन आणि कोमल यांचा काही वर्षापुर्वी विवाह झाला होता. सचिनने आरोपी रवींद्र याच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. व्याजाने घेतलेल्या पैशांच्या व्यवहारातून कोमलची आरोपी रवींद्र याच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले होते. व्याजाने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावल्याने सचिनने गुरुवारी (१७ एप्रिल) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
रवींद्रचा त्रास, तसेच पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधांची माहिती मिळाल्यानंतर सचिन नैराश्यात होता. नैराश्य, तसेच त्रासामुळे भाऊ सचिन याने गळफास घेऊन आत्महत्या केली, असे सचिन यांची बहीण सविता गिरी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमर काळंगे तपास करत आहेत.