लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : बेकायदा सावकारी करणाऱ्या दोघांच्या त्रासामुळे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घोरपडीतील ढोबरवाडीत घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन वानवडी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
सचिन कट्टीमणी (रा. ढोबरवाडी, घोरपडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याबाबत सचिन यांची आई येलक्का हनुमंता कट्टीमणी (वय ६१, रा. ढोबरवाडी, घोरपडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, स्टिव्हन नेगल, विजय इंगळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन यांनी आरोपी स्टिव्हन आणि विजय यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. व्याजाने घेतलेले पैसे, तसेच व्याजाची रक्कम परत करण्यावरुन आरोपींनी सचिन यांना त्रास देण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून वेळोवेळी धमकी दिली. धमकीमुळे सचिन नैराश्यात होते. १ मार्च रोजी सचिन यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. सचिन यांची आई येलक्का यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. चौकशीत सचिन यांनी आरोपींनी दिलेल्या त्रासामुळे आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक रियाज सय्यद तपास करत आहेत.
बेकायदा सावकारी करणाऱ्यांविरुद्ध तत्कालिन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कारावईचे आदेश दिले होते. सावकारी करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते.