पुणे : खडकवासला धरणात एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. कौटुंबिक वादातून त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. स्वप्नील रामभाऊ कणसे (वय ३४ ,सध्या रा. सिद्धी हाईट्स, शिवणे, मूळ रा. सावरगाव, जि. बीड ) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
कणसे रंगकाम करायचा. त्याला दारु पिण्याचे व्यसन होते. कौटुंबिक वादातून तो घरातून निघून गेला. तो घरी न परतल्याने आईने उत्तमनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. खडकवासला धरणातील मोरीजवळ एका तरुणाचा मृतदेह पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तरंगताना पाहिला. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.
हेही वाचा – चंद्रकांत पाटील म्हणतात, ‘मी पुण्याचा सहपालकमंत्री!’
हेही वाचा – पुण्यातील मावळ, शिरूर लोकसभा मनसे लढवणार; उमेदवार राज ठाकरे ठरवणार!
हवेली पोलीस ठाण्यातील हवालदार निलेश राणे, विलास प्रधान, दिनेश कोळेकर, दीपक गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यातून मृतदेह बाहेर काढला. हवेली पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नाेंद करण्यात आली असून कौटुंबिक वादातून त्याने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.