पुणे : शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात एका तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. कौटुंबिक कलहातून त्याने तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती प्राथमिक चौकशीत पोलिसांना मिळाली आहे.
सोहेल येणीघुरे (वय २८, रा. पाषाण) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सावंत यांनी दिली. येणपुरे मजूरी करतो. त्याचे पत्नीशी वाद झाले होते. मला घटस्फोट घ्यायचा आहे, असे सांगून तो पत्नी आणि दोन मुलांसोबत शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास तो शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात आला. शनिवारी न्यायालयीन कामकाजाला सुटी असल्याने आवारात फारशी वर्दळ नव्हती. न्यायालयाच्या आवारात त्याने पत्नीशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर पत्नीकडील ओढणी घेतली. त्याने लाॅयर्स कन्झुमर्स सोसायटीच्या परिसरात चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
पोलीस वसाहतीत युवकाची आत्महत्या शिवाजीनगर पोलीस वसाहतीत महाविद्यालयीन युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आले. प्राथमिक तपासात प्रेमभंग झाल्याने युवकाने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ऋषीकेश दादा कोकणे (वय १९, रा. शिवाजीनगर पोलीस वसाहत, ई ब्लाॅक) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. ऋषीकेशचे वडील राज्य राखीव पोलीस दलाच्या दौंड विभागात सहायक फौजदार आहेत. तो कला शाखेत होता. त्याचे आई-वडील शनिवारी विवाह समारंभानिमित्त बाहेर गेले होते. शनिवारी त्याने वसाहतीतील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या मित्राने सकाळी ऋषीकेशच्या मोबाइलवर संपर्क साधला. मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर या घटनेची माहिती मित्राने शिवाजीनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. तेव्हा त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.