पुणे : तलाठी भरती परीक्षेतील गैरप्रकाराच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे बालगंधर्व चौकात आंदोलन करण्यात येणार होते. मात्र त्यासाठी पोलिसांनी परवानगी दिली नाही. त्यानंतर युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले. मात्र आंदोलकांना लगेचच पोलिसांनी ताब्यात घेतले.
नुकत्याच झालेल्या तलाठी भरतीच्या निकालात पुन्हा गोंधळ, मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. त्यामुळे तलाठी भरती घोटाळ्यांची एसआयटीमार्फत चौकशी होत नाही, तोपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र युवक काँग्रेसने दिला. महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, अक्षय जैन, प्रवीणकुमार बिरादार, प्रथमेश अबनावे, रोहन सुरवसे, अनिकेत नवले, तारीक बागवान आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सरकारने विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणे थांबवावे. स्पर्धा परीक्षेबाबत सरकारच्या ढिसाळ व भ्रष्ट कारभाराविरोधात परीक्षार्थींना आंदोलन करण्यास सरकार हुकूमशाही पद्धतीने मनाई करत असले, तरी विद्यार्थ्यांसाठी लढा दिला जाणार असल्याचे अक्षय जैन यांनी सांगितले.