पुणे : लष्करात नोकरीच्या आमिषाने दोन तरुणांची चार लाख ८० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी उत्तराखंडमधील एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याबाबत रवींद्र जनार्दन बिलाडे (वय २३, रा. बोरकुल, धुळे ) याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, मोहित रामसिंग धामी (रा. उत्तराखंड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिलाडे याची एका परिचितामार्फत गेल्या वर्षी मार्च महिन्यात आरोपी धामी याच्याशी ओळख झाली होती. त्या वेळी धामीने लष्करी रुग्णालयात नोकरी करत असल्याची बतावणी त्यांच्याकडे केली होती. बिलाडे आणि त्याचा मित्र दीपक रोकडे यांना लष्करात नोकरी लावण्याचे आमिष धामीने दाखविले होते. त्यानंतर धामीने बिलाडेकडून दोन लाख ८० हजार रुपये घेतले, तसेच त्याचा मित्र रोकडे याच्याकडून दोन लाख रुपये घेतले. दोघांनी त्याला एकूण मिळून चार लाख ८० हजार रुपये दिले. त्यानंतर दोघांनी त्याच्याकडे लष्करातील नोकरीबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बिलाडेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक मोहिते तपास करत आहेत.