पुणे : वर्षभरापासून समाजमाध्यमातील जाहिराती, तसेच ध्वनिचित्रफितीस दर्शक पसंती मिळवून देण्याच्या आमिषाने सामान्यांची फस‌णवूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहे. ऑनलाइन टास्कच्या आमिषाने हडपसर भागातील एका तरुणाची सायबर चोरट्यांनी साडेसतरा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या बाबत एका तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्यांनी संदेश पाठविला होता. घरातून ऑनलाइन काम केल्यास चांगले पैसे मिळतील, असे आमिष चोरट्यांनी त्याला दाखविले होते. पुणे शहरातील उपहारगृहांची माहिती देणारा मजकूर समाजमाध्यमातून प्रसारित करण्यात येणार असून, त्याला ऑनलाइन पद्धतीने दर्शक पसंती मिळवून देण्यचे काम केल्यास चांगले पैसे मिळतील, असे सांगून चोरट्यांनी त्याला जाळ्यात ओढले. त्यानंतर चोरट्यांनी त्याला काम दिले. हे काम पूर्ण केल्यानंतर चोरट्यांनी त्याला लगेच १५० रुपये ऑनलाइन पद्धतीने दिले.

हेही वाचा – पिंपरीत ३ पिस्तुले आणि ४ जिवंत काडतुसे बाळगणारे सराईत गुन्हेगार जेरबंद; दरोडा विरोधी पथकाची कारवाई

हेही वाचा – मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वाहतूक बदल; मुंबईकडे जाणारी एक मार्गिका बंद

पैसे मिळाल्यानंतर तरुणाचा विश्वास बसला. चोरट्यांनी पुन्हा त्याच्याशी संपर्क साधला. ऑनलाइन टास्कमध्ये पैसे गुंतविल्यास चांगले पैसे परताव्यापोटी मिळतील, असे सांगितले. चोरट्यांनी वेळोवेळी त्याच्याकडून ऑनलाइन पद्धतीने १७ लाख ७० हजार ३२६ रुपये घेतले. खात्यात पैसे जमा झाल्यानंतर त्याच्याशी संपर्क तोडला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस निरीक्षक भोसले तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth earned 150 rupees in online tasks and lost seventeen and a half lakhs pune print news rbk 25 ssb