पुणे : व्यापारी जहाजावर काम करणारा पुण्यातील २२ वर्षीय तरुण शुक्रवारी (५ एप्रिल) रात्रीपासून बेपत्ता असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या कुटुंबाला याबाबतची माहिती दिली. या प्रकरणात परराष्ट्र मंत्रालय, जहाज बांधणी मंत्रालयाशी संपर्क करून मुलाचा शोध घ्यावा, अशी विनंती त्याच्या कुटुंबीयांनी केली आहे.
हेही वाचा >>> पिंपरी: विरोधकांचे पैसे घ्या पण मतदान महाविकास आघाडीला करा- शिवसेना उमेदवार संजोग वाघेरे
वारजे भागात राहणारा प्रणव गोपाळ कराड गेल्या सहा महिन्यांपासून मुंबईतील विल्हेल्मसेन शिप मॅनेजमेंट इंडिया या कंपनीत नोकरीस असल्याची माहिती त्याचे वडील गोपाळ कराड यांनी दिली. गोपाळ कराड चालक आहेत. प्रणवने कोथरुड भागातील एका संस्थेतून नॉटिकल सायन्स अभ्यासक्रम पूर्ण केला होता. तो अमेरिकेतील विल्हेल्मसेन शिप मॅनेजमेंटमध्ये काम करत होता. तो कंपनीच्या जहाजावर डेक कॅडेट म्हणून नियुक्तीस होता. शुक्रवारी रात्री प्रणवच्या वडिलांशी कंपनीतील अधिकाऱ्यांनी संपर्क साधला. तो बेपत्ता झाल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली. सिंगापूर आणि इंडोनेशिया दरम्यान प्रणव जहाजातून बेपत्ता झाला असल्याची माहिती इमेलद्वारे कळविण्यात आली. त्यानंतर कंपनीने शोधमोहिमेविषयी काही माहिती दिली नाही, असे कराड यांनी नमूद केले. प्रणव नेमका कसा बेपत्ता झाला, याबाबतची मााहिती देण्यात आली. विल्हेल्मसेन शिप मॅनेजमेंट कंपनीकडून प्रणवच्या सहकाऱ्यांचे मोबाइल क्रमांक उपलब्ध करून देण्यास नकार दिला आहे. या प्रकरणात परराष्ट्र मंत्रालय, जहाज बांधणी मंत्रालयाशी संपर्क करुन मुलाचा शोध घेण्याची मागणी कराड यांनी केली आहे.