उच्च शिक्षण घेतल्यानंतर कृषी क्षेत्रातील कंपनीत नोकरी करताना पर्यावरणाची होत असलेली हानीबाबत जागृती करण्याचा मनात विचार आला.. त्याने पर्यावरण जागृती करण्यासाठी सायकलवर भारतभ्रमण करण्यास सुरुवात केली. दीडशे शाळा आणि पंधरापेक्षा जास्त विद्यापीठांत झाडे लावण्याचा संदेश देत त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.. हा तरुण दीड वर्षांत चौदा हजार किलोमीटरचा प्रवास करत सोमवारी पुण्यात दाखल झाला आहे.
उज्ज्वल पाल (कोलकता) असे या तरुणाचे नाव आहे. तो कृषी शाखेचा पदवीधर असून त्याने व्यवस्थापन शाखेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. अकरा वर्षे कृषी क्षेत्रातील खासगी कंपनीत काम केल्यानंतर वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचे दिसून आले. पाल यांनी देशात वृक्षलागवडीचा संदेश देण्यासाठी सायकलवर भारतभ्रमणचे ‘ग्रीन ऑन व्हील’ मिशनला डिसेंबर २०११ मध्ये सुरुवात केली. कोलकता येथून निघून झारखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्रातील नागपूर, वर्धा, औरंगाबाद, मुंबईतून पुण्यात पाल सोमवारी दाखल झाला आहे.
याबाबत पाल याने सांगितले, की देशात होणाऱ्या वृक्षतोडीमुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. येणाऱ्या पिढीला ऑक्सिजन मिळेला का, इथ पर्यंत प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे देशात झाडे लावण्याचा संदेश देण्यासाठी एकटय़ाने सायकलवर भारतभ्रमणचा निर्णय घेतला. त्याला कुटुंबीय, मित्रांनी प्रोत्साहन दिले. घरातून नऊशे रुपये, सायकल, कपडे, एक लॅपटॉप, डायरी आणि इतर जीवनपयोगी साहित्य घेतले. रस्त्यात दिसेल त्या शाळेत गेलो. त्या ठिकाणच्या शिक्षकांशी बोलून विद्यार्थ्यांना वृक्ष लावगडीचे महत्त्व पटवून देत प्रत्येकाने एकतरी वृक्ष लावून त्याचे तीन ते चार वर्षे संवर्धन करावे, अशी माहिती देतो. विद्यापीठांमध्ये प्रात्याक्षिकांसह याची माहिती देतो. मी येण्याच्या अगोदर मित्राने सर्व तयारी करून ठेवलेली असते. साधारण दिवसाला सत्तर ते ऐंशी किलोमीटर प्रवास करतो. सायंकाळी शाळा, मंदिर, मित्र, धाबे ज्या ठिकाणी सोय होईल तेथे राहतो. आता पुण्यात सदाशिव पेठेत एका मित्राकडे राहत असून येथून गोव्याला जाणार असून त्यानंतर दक्षिण भारत, ईशान्येकडील राज्यांचा प्रवास करणार आहे. साधारण आणखी बारा हजार किलोमीटरचा प्रवास बाकी आहे
‘प्रत्येकाने एकतरी झाड लावलेच पाहिजे’
शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, छोटे-मोठे गाव, रस्त्यात भेटणाऱ्यास एकतरी झाड लावा, असा संदेश देतो. शक्य होईल त्या ठिकाणी नागरिकांना वृक्षरोपण करण्यास लावतो. आतापर्यंत अनेक ठिकाणी वृक्षारोपण केले आहे, असे उज्ज्वल पाल यांनी सांगितले. पाल यांचे फेसबुकवर ‘ग्रीन ऑन व्हील’ नावाचे पेज बनविले आहे. त्यावर त्याच्या भारत भ्रमणाचे छायाचित्र व माहिती देण्यात आली आहे.

Story img Loader