तरुणांना नोकऱ्या नाहीत, अशी ओरड सातत्याने होत असते. एखाद्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपनीत मुलाखतीसाठी हजारो तरुणांच्या रांगा लागल्याचे चित्र पुण्यासारख्या आयटीनगरीत वारंवार दिसून येते. त्यामुळे बेरोजगारांना नोकरीच्या पुरेशा संधी नाहीत, अशी चर्चा सुरू होते. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडून तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले जाते. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा योजनेअंतर्गत हे आयोजन होते. उद्योगांचे प्रतिनिधी आणि नोकरीस इच्छुक उमेदवारांना एकाच मंचावर आणण्याचे काम या माध्यमातून केले जाते. यातून उमेदवारांना मुलाखतीची संधी मिळते आणि उद्योगांना आवश्यक मनुष्यबळाचा पुरवठा होतो. मात्र, उमेदवारच याकडे पाठ फिरवत असल्याचे दिसते.

कौशल्य विकास केंद्राने एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत ५ रोजगार मेळावे आयोजित केले. या मेळाव्यांमध्ये दहावी उत्तीर्णांपासून आयटीआय पदविकाधारक ते अभियांत्रिकी पदवीधारकांपर्यंत पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी होत्या. विशेषत: आयटीआय पदविकाधारकांसाठी जास्त जागा होत्या. केंद्राने आयोजित केलेल्या एकूण ५ मेळाव्यांमध्ये ७८ कंपन्या सहभागी झाल्या होत्या. या मेळाव्यात एकूण ६ हजार २१९ रिक्त पदे होती. पण, मेळाव्याला उपस्थित उमेदवारांची संख्या होती १ हजार ३५!

विशेष म्हणजे, या ५ मेळाव्यांत ३८३ उमेदवारांची प्राथमिक निवड झाली आणि त्यातील केवळ २९ जणांची अंतिम निवड झाली. एकंदरित आकडेवारी पाहिल्यास एकूण रिक्त पदांच्या केवळ १५ टक्के उमेदवार या मेळाव्याला उपस्थित राहिले. त्यातील सुमारे ३० टक्के उमेदवारांची प्राथमिक निवड झाली. प्राथमिक निवड झालेल्यांपैकी केवळ १० टक्के उमेदवारांची निवड झाली. एकूण रिक्त पदांचा विचार करता, अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची संख्या अर्धा टक्क्याहून कमी आहे.

सरकारी रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून पुण्यासारख्या जिल्ह्यात वर्षभरात फक्त २९ जणांना नोकरीची संधी मिळत असेल, तर सरकारी यंत्रणांनी यावर गांभीर्याने विचार करायला हवा. रोजगार मेळाव्यात तरुण का येत नाहीत, यामागील कारणांचा शोध घ्यायला हवा. याचबरोबर बेरोजगार तरुणांपर्यंत पोहोचण्यास यंत्रणा कमी पडत आहे का, याचाही विचार करायला हवा. रोजगार मेळाव्यात तरुणांना अधिकाधिक चांगल्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांना त्याकडे आकर्षित करण्याचे आव्हान सरकारी यंत्रणांसमोर आहे.

सेवा क्षेत्रातील संधीचा परिणाम

रोजगार मेळाव्यात विविध क्षेत्रांतील नोकरीच्या संधी असूनही उमेदवार येत नाहीत. कारण, सध्या दहावी आणि बारावी झालेल्या तरुणांना सेवा क्षेत्रात अनेक नोकऱ्या उपलब्ध आहेत. ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये उत्पादन वितरणाची कामे करून त्यांना चांगले पैसे मिळतात. अशा प्रकारच्या नोकरीच्या संधी सध्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे उमेदवार सरकारच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्यात येत नाहीत. याचबरोबर कौशल्य विकास विभाग केवळ कंपन्या आणि उमेदवार यांना एकत्र आणण्याचे काम करतो. कंपन्या उमेदवारांची मुलाखत घेऊन त्यांची निवड करतात. त्यात विभागाचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप असत नाही, अशी माहिती कौशल्य विकास विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त सागर मोहिते यांनी दिली.

sanjay.jadhav@expressindia.com