पिंपरी : बहिणीने केलेला आंतरधर्मिय विवाह मान्य नसल्याने भावाने दाजीचा डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. डिझेलने मृतदेह जाळून टाकला आणि पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने हाडे व राख पोत्यांमध्ये भरून नदीत टाकून दिल्याची घटना मोशीत घडल्याचे उघडकीस आले आहे.
अमिर मोहम्मद शेख (वय २५, रा. आदर्शनगर, मोशी, मूळ अहमदनगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पंकज विश्वनाथ पाईकराव (वय २८, रा. मार्तंडनगर, चाकण, मूळ हिंगोली), सुशांत गोपाळ गायकवाड (वय २२, रा. अहमदनगर) आणि सुनील किसन चक्रनारायण (वय ३३, रा. मोई रोड, चिंबळी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. गणेश दिनेश गायकवाड हा पसार आहे.
अमिर आणि सुशांतची बहीण यांचा सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. दोघांनी पळून जाऊन लग्न केले होते. त्यानंतर दोघेही मोशी येथे वास्तव्यास होते. मात्र, हा आंतरधर्मिय विवाह अमिरच्या सासरच्या लोकांना मान्य नव्हता. अमिर हा मोशीत एका कंपनीत वाहनचालक म्हणून नोकरी करीत होता. तो १५ जून रोजी राहत्या घरातून कंपनीत कामाला जातो, असे सांगून निघून गेला. तो परत घरी न आल्याने त्याची पत्नी अरिना हिने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याबाबत तक्रार दाखल केली होती. तपासामध्ये अमिरला पंकजने फोन करून बोलावून घेतल्याचे समोर आले. अमिरचे वडील मोहम्मद यांनीही सुनेच्या माहेरच्या लोकांवर संशय व्यक्त केला होता.
पोलिसांनी पंकजला २१ जून रोजी अटक केली. चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली. आरोपींनी अमिरला दारू पिण्याच्या बहाण्याने फोन करून बोलावून घेतले. त्याला कुरुळी जवळील पुणे-नाशिक महामार्गावरील एका हॉटेलमध्ये नेऊन दारू पाजली. त्यानंतर तेथून अमिर हा नाणेकरवाडी येथे कंपनीत कामावर गेला. तिन्ही आरोपींनी वेगवेगळ्या दुचाकीवर जावून अमिरला पुन्हा दारू पिण्याच्या बहाण्याने बोलावून घेले. पंकज व अमिर हे मेदनकरवाडी गावच्या हद्दीतील जंगलात दारू पित बसले. त्यावेळी पाठीमागून आलेल्या सुशांत व गणेशने अमिर याला मारहाण करत जंगलात ओढत नेले आणि डोक्यात दगड घालून त्याचा खून केला.