पुणे : विरुद्ध दिशेने येणाऱ्या खासगी बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना नगर रस्त्यावर घडली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी बसचालकाला ताब्यात घेतले. बसचालकाने मद्यप्राशन केल्याची माहिती मिळाली आहे. नगर रस्त्यावर शनिवारी दुपारी खासगी बसचालक विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने आला. समोरुन येणाऱ्या दुचाकीस्वाराला बसने धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला. अपघातानंतर नागरिकांनी बसचालकाला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.
बसचालकाने मद्यप्राशन केल्याची माहिती नागरिकांनी दिली. पोलिसांनी बसचालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती येरवडा पाेलिसांनी दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा…बारामतीत तरुणाचा खून करुन पसार झालेले तिघे, गजाआड
क्रेनच्या धडकेत तरुण जखमी
क्रेनच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना कात्रज चौक परिसरात घडली. सोनू अब्दुल गफूर (वय ३१, रा. सच्चाईमातानगर, कात्रज) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी क्रेनचालक मिथन भगेलूमिया (वय १९, रा. भिलारेवाडी, कात्रज) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गफूर याच्या दुचाकीतील पेट्रोल संपल्याने गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास तो दुचाकी घेऊन पेट्रोल पंपावर निघाला होता. कात्रज चौकात पाठीमागून आलेल्या क्रेनने गफूरला धडक दिली. क्रेनचे चाक पायावरुन गेले. त्याचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला. गफूरला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हवलदार भोसले तपास करत आहेत.