पुणे: मैत्रीसंबंध निर्माण करणाऱ्या एका ॲपवरुन (उपयोजन) झालेली ओळख तरुणाला महागात पडली. ॲपवर झालेल्या ओळखीतून तरुणाला भेटण्यासाठी बोलावून तरुणाला लुटण्यात आल्याची घटना हडपसर रेल्वे स्थानक परिसरात घडली. चोरट्यांनी तरुणाला मारहाण करुन त्याच्याकडील ४२ हजारांची सोनसाखळी चोरुन नेली.
याबाबत एका तरुणाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार २४ वर्षीय तरुण हडपसर भागात राहायला आहे. त्यची एका ॲपवरुन तरुणाशी ओळख झाली होती. २३ जानेवारी रोजी तरुणाला आरोपीने हडपसर रेल्वे स्थानक परिसरात बोलावून घेतले. लक्ष्मी लाॅन परिसरात एका शेतात तरुणाला मारहाण करुन त्याच्याकडील ४२ हजारांची सोनसाखळी चोरली. त्यानंतर तरुणाला जिवे मारण्याची धमकी देऊन या प्रकाराची कोणाला वाच्यता करु नको, असे सांगितले. घाबरलेल्या तरुणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली.
याच परिसरात एका संगणक अभियंता तरुणाला धमकावून लुटण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. ॲपवरुन झालेल्या ओळखीतून तरुणाला हडपसर रेल्वे स्थानक परिसरात बोलावून चोरट्यांनी त्याला मारहाण केली होती. चोरट्यांनी त्याच्याकडील रोकड लुटली होती. अशाच प्रकारची घटना धायरीतील डीएसके विश्व रस्ता परिसरात घडली होती. एका व्यावसायिकाला जाळ्यात ओढून त्याला लुटण्यात आले होते. याप्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी तरुणला अटक केली होती. त्याच्याबरोबर असलेल्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले होते.