आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत व्यवसाय करण्यासाठी युवकांनी कास धरावी, अशी अपेक्षा तामिळनाडूचे राज्यपाल डॉ. के. रोसय्या यांनी बुधवारी व्यक्त केली. आर्य वैश्य समाजातील पालकांनीदेखील आपल्या मुलांना त्यादृष्टीने शिक्षण देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र आर्य वैश्य समाज पुणे आणि तिरुमला तिरुपती देवस्थान ई-दर्शन केंद्रातर्फे मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एस. डी. गुंडेवार यांच्या हस्ते डॉ. के. रोसय्या यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष शरद गुंडावार, पुणे विभागाचे अध्यक्ष भगवान नगरकर, उपाध्यक्ष संतोष बासटवार, सचिव श्रीराम उपलेंचवार याप्रसंगी उपस्थित होते.
रोसय्या म्हणाले, समाजामध्ये बदल झाला आहे. त्यानुसार खरेदी-विक्रीच्या पद्धतीमध्येदेखील बदल झाला आहे. पूर्वी असलेल्या दुकानांची जागा आता मॉलच्या वाढत्या संख्येने घेतली आहे. खरेदी करण्यास जाण्यासाठी पूर्वी खिशामध्ये पैसे असण्याची आवश्यकता होती. आता त्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर केला जात आहे. हे बदल आपण थोपवू शकत नाही. त्यामुळेच या बदलांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. सध्याच्या आधुनिक युगामध्ये पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करून चालणार नाही. हे आधुनिक प्रवाह ध्यानात घेऊन त्यानुसार केवळ आपल्या व्यवसायामध्ये बदल करणे गरजेचे आहे असे नाही. तर, मुलांनादेखील आधुनिकत शिक्षण देणे आवश्यक आहे.

Story img Loader