‘‘राजकारणाला चांगले वळण देण्यासाठी त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून शिक्षित तरुणांनी राजकारणामध्ये यावे,’’ असे आवाहन नासामधील माजी संशोधक आणि बुलढाणा जिल्हा परिषदेचे सदस्य बाळासाहेब दराडे यांनी परिवर्तन स्नेह संवादमध्ये रविवारी केले.
परिवर्तन प्रतिष्ठानतर्फे परिवर्तन स्नेह संवादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी परिवर्तन सायकल अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आले. या वेळी ग्रामीण भागातील २१ शाळांमधील चारशे विद्यार्थ्यांना सायकली देण्यात आल्या. त्या वेळी क्रिकेटपटू इरफान पठाण, ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, एस बालन ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक पुनीत बालन, समाजसेवक आनंद भोसले, डब्लूएस डेव्हलपर्सचे जयंत वायदंडे, परिवर्तन प्रतिष्ठानचे विश्वस्त समीर जाधवर, कार्यकर्ते युवराज सोनार, संदीप रायकर, प्रतीक टिपणीस आदी उपस्थित होते.
या वेळी दराडे म्हणाले, ‘‘राजकारणाकडे नकारात्मपणे पाहिले जाते. या दृष्टिकोनामुळे शिक्षित लोक राजकारणापासून लांब राहणे पसंत करतात. मात्र, राजकारणाला चांगले वळण देण्यासाठी त्या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन बदल घडवणे आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षित तरुणांनी राजकारणाकडे वळणे आवश्यक आहे.’’
‘चांगले काम करणाऱ्या सर्व संस्था एकत्र आल्या, तर बदल घडायला वेळ लागणार नाही,’’ असे मत वैद्य यांनी व्यक्त केले. या वेळी इरफान पठाण याने विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

Story img Loader