पुण्यात किंवा मुंबईत राहणाऱ्या पन्नासहून अधिक तरुणांचे वेळापत्रक सध्या पाच दिवस नोकरी आणि शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशी मराठवाडय़ातील उस्मानाबाद जिल्ह्य़ात श्रमदान असे झाले आहे. पुण्या-मुंबईतील पन्नासहून अधिक तरुणांनी उस्मानाबाद जिल्ह्य़ातील हिवरा गावामध्ये पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ या योजनेत काम सुरू केले असून गावात लोकसहभागातून जलसंधारणाची कामे सुरू झाली आहेत. या गावाचा कायापालट करण्याचे काम गावकरी आणि तरुणांच्या श्रमदानातून आकाराला येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठवाडय़ामधील उस्मानाबाद जिल्हा आर्थिकदृष्टय़ा मागास आणि दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. उस्मानाबाद जिल्ह्य़ातील भूम तालुक्यामध्ये धुळे-सोलापूर महामार्गापासून जवळ हिवरा हे छोटे गाव आहे. त्या भागातील अनेक तरुणांनी शिक्षण घेऊन नोकरीसाठी पुणे, मुंबईसारखी शहरे गाठली आहेत. मात्र नोकरी मिळाल्यानंतरही आपल्या गावासाठी काही तरी करण्याचा निर्धार गावातील तरुणांनी केला आहे. याच तरुणांनी गावावरील दुष्काळाची परिस्थिती बदलण्यासाठी गावात जलसंधारणाची कामे करण्याचा निर्णय घेतला. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अभियंता असलेले सुदर्शन जगदाळे आणि सुसेन सावंत यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. पुणे आणि मुंबईमध्ये नोकरीसाठी असलेल्या सर्व तरुणांची बालेवाडी येथे त्यांनी बैठक घेतली. त्यानंतर पाणी फाउंडेशनने सुरू केलेल्या ‘वॉटर कप’ स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय या सर्वानी घेतला.

या तरुणांनी गावातील सर्वाना विश्वासात घेऊन त्यांना जलसंधारणाचे महत्त्व सांगितले. जलसंधारणाची कामे झाली तर पाण्याचा थेंबन् थेंब शिवारातच अडवला जाईल. त्याचा फायदा विहिरी आणि बोअरवेलना होईल, हा विचार गावात मांडण्यात आला. गावातील प्रत्येकाला जलसंधारणाच्या कामाचे महत्त्व पटू लागले. गावातील सर्वानी रोज श्रमदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रोज शंभर ग्रामस्थ कोणताही मोबदला न घेता श्रमदान करत आहेत. याशिवाय प्रत्येक रविवारी महाश्रमदान दिन म्हणून आख्खे गाव दोन तास श्रमदानात भाग घेते. जलसंधारणाच्या कामामध्ये चाऱ्या खोदणे, बांध बंदिस्ती, दगडी बंधारे, कोल्हापुरी बंधारे, गॅबियन बंधारे, माती बंधारे आदी कामे हाती घेण्यात आली आहेत.

काही कामे यांत्रिकी पद्धतीने केली जात आहेत. काही दानशूर व्यक्ती, संस्था सढळ हस्ते मदत करत असल्याचे सुदर्शन जगदाळे यांनी सांगितले. या कामामध्ये गावामधील बाबासाहेब कवडे, राहुल सावंत, सचिन जगदाळे, गणेश कवडे, बबन जगदाळे समन्वय ठेवण्याचे काम करत आहेत.