तरुणाईच्या मनामध्ये सामाजिक बांधिलकीबरोबरच मानवतेचे मूल्य रुजविले पाहिजे, कारण मानवता हेच जागतिक संस्कृतीतले सर्वश्रेष्ठ मूल्य आहे, असे विचार सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले.
भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे यशवंतराव मोहिते महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या राज्यस्तरीय सामाजिक सांस्कृतिक स्पर्धाचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. राज्याचे वनमंत्री व भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम, कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ. विश्वजित कदम, रजनी पाटील, सहकार्यवाह प्राचार्य के. डी. जाधव, डॉ. अतुल साळुंखे, अरुण पुजारी, डॉ. अरुण निगवेकर, प्रा. के. व्ही. मोहिते, सारंग पाटील आदी त्या वेळी उपस्थित होते. सिक्कीमच्या राज्यपालपदी निवड झाल्याबद्दल पाटील यांचा या वेळी पतंगराव कदम यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.
पाटील म्हणाले की, तरुणांमध्ये असलेल्या उत्साहाला विधायक वळण देण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून केले जाते. भारती विद्यापीठाने शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये स्वत:चा वेगळा ठसा निर्माण केला आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवर पडणारी कौतुकाची थाप त्यांचा उत्साह द्विगुणित करणारी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कौतुकाचे असे महोत्सव झाले पाहिजेत.
पतंगराव कदम म्हणाले की, वन जाणिवा समृद्ध करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेकडून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना वन खात्याच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.
शिवाजीराव कदम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. राजेंद्र उत्तुरकर व ज्योती मंडलिक यांनी सूत्रसंचालन, तर प्राचार्य जाधव यांनी आभार प्रदर्शन केले. 

Story img Loader