मराठीसाठी वाहिलेली हँडल ट्विटरवर कार्यरत
चिन्मय पाटणकर, पुणे : आभासी जगातही मराठी भाषेचा वापर वाढावा, मराठीची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली जावी, यासाठी भाषाप्रेमी तरुण कार्यकर्ते समाजमाध्यमांत प्रयत्न करत आहेत. ट्विटरसारख्या समाजमाध्यमात खास मराठीसाठी काही हँडल्स कार्यरत असून, वापरात नसलेल्या शब्दांना पुन्हा मराठीत आणण्यापासून विविध उपक्रमांतून मराठीचा प्रचार-प्रसार आभासी जगात केला जात आहे.
गेल्या काही वर्षांत समाजमाध्यमांमध्ये प्रादेशिक भाषांचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. २०१७ मध्ये गुगल आणि केपीएमजी यांच्या संयुक्त अहवालातही याच मुद्दय़ावर भर देण्यात आला होता. त्यामुळेच २०२१ पर्यंत समाजमाध्यमांत हिंदीनंतर सर्वाधिक वापर मराठी आणि बंगाली भाषांचा असेल, असे त्या अहवालात नमूद करण्यात आले होते. या पाश्र्वभूमीवर मराठीच्या प्रचार आणि प्रसारासाठी काही ट्विटर हँडल्स महत्त्वपूर्ण काम करत आहेत. या हँडल्सना हजारो पाठीराखेही आहेत.
आजचा शब्द हे हँडल चालवणारा स्वप्नील शिंगोटे ट्विटरवरील मराठीच्या वापराविषयी तो म्हणाला, ‘गेली तीन वर्षे मी मराठीच्या प्रचारासाठी काम करतो आहे. माझ्या हँडलद्वारे मराठीतील काही शब्दांचा परिचय करून दिला जातो. त्याशिवाय ट्विटर संमेलन हा उपक्रमही केला जातो. तीन वर्षांपूर्वीपर्यंत ट्विटरवर देवनागरीत, विशेषत मराठीत फार काही लिहिले जात नव्हते. मात्र, आता मराठीच्या वापराविषयीची जागरूकता वाढत आहे. त्यामुळेच मराठीचा वापरही वाढत आहे.’
‘मराठीच्या प्रेमापोटी मी हँडल चालवतो. आम्ही मराठीप्रेमी ट्विटर हँडल्सवरही एकत्र येऊन काम करतो. त्यामुळे मराठी ट्विट्सना मिळणारा प्रतिसाद प्रचंड वाढला आहे. त्यामुळे आता एकटय़ाने हँडल सांभाळणे शक्य नाही. मित्रांना सोबत घेऊन काम करत आहे. दररोज हजारो ट्विट मराठीतून केली जातात, त्यातून भाषिक भान वाढत आहे याचा आनंद वाटतो,’ असे इयेमराठीचियेनगरी हे हँडल चालवणाऱ्या राहुल वेळापुरेने सांगितले.
मराठीसाठी राबवले गेलेले काही उपक्रम
* मराठीला अभिजात दर्जा
* मराठीची सक्ती करा
* हिंदी हटवा
* मराठी बोला चळवळ
* ट्विटर मराठी संमेलन
* थरूरीझम
मराठीच्या प्रचारासाठी कार्यरत
काही ट्विटर हँडल्स आणि त्यांचे पाठीराखे
आजचाशब्द (@marathiword) – १८.२ हजार
इयेमराठीचियेनगरी (@MarathiBrain) – ४३.४ हजार
मराठीविश्वपैलू (@marathibrain) – ४२.४ हजार
#म (@HashTagMarathi) – ९ हजार ६५०
बियाँडमराठी (@beyondmarathi) – ५ हजार ७०१
माझी मराठी (@Mazi_Marathi) – १३.८ हजार
संपूर्ण महाराष्ट्र #मराठी (@MaharashtraRT) – ७ हजार ७४१
आम्ही मराठी (@WeMarathi) – १८.९ हजार
मराठी विचारधन (@marathivichar) – १८.३ हजार
ज्ञानभाषा मराठी (@SarvatraMarathi) – ५ हजार ६६२