पिंपरी- चिंचवड मध्ये आठ ते नऊ जणांच्या टोळक्याने दोघांना फिल्मी स्टाईल मारहाण केली. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात अल्पवयीन मुलाचा देखील सहभाग आहे. संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोहन हाईट्स येथे ही घटना घडली. वसीम साबीर सय्यद, हांजला जबर कुरेशी, अमन अजित शेख आणि रेहमान शेख अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. एका अल्पवयीन मुलाचा देखील यात सहभाग आहे.
पिंपरीतील रोहन हाईट्स येथे आठ ते नऊ जणांची टोळी गप्पा मारत होती. तिथेच दोन तरुण मोबाईल पाहत पायऱ्यांवर बसले. दोघांपैकी एक जण टोळक्याकडे बघून हसला. टोळक्यातील एक जण त्यांच्या दिशेने आला आणि हसण्याच कारण विचारत कानशिलात लगावली. बघता- बघता इतर आरोपींनी दोघांना लाथ बुक्क्यांनी आणि खुर्चीने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. हे स्पष्ट सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे.
एक मिनिटांपेक्षा अधिक वेळ आठ- ते नऊ जण त्या तरुणाला फिल्मी स्टाईल मारहाण करत होते. तरुणाच्या साथीदाराला देखील मारहाण करण्यात आली आहे. तरुणाने स्वतःची सुटका करून पळून गेला. घटनेचा सीसीटीव्ही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संत तुकाराम पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार अशा घटना घडत आहेत. यावर संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याचे नुकताच पदभार स्वीकारलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार यांची पकड नाही. कुंभार यांच्या विषयी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार यांना बदलावं अशी मागणी जोर धरू लागली आहे. गेल्या आठवड्यात दोन गटात मारामारी झाली होती. तेव्हा देखील वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार यांना काही ही कल्पना नव्हती. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कुंभार हे खडबडून जागे झाले होते. आता देखील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास घडली.