लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : दुचाकी पुढे नेण्याच्या (ओव्हरटेक) वादातून तरुणाचा अल्पवयीनांनी कोयत्याने वार करुन निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द भागात घडली. अल्पवयीनांनी तरुणावर तब्बल ३५ वार केले. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याबरोबर असलेल्या एका साथीदाराचा शोध सुरू आहे.

अभय मारुती सुर्यवंशी (वय २०, रा.गणेशनगर कॉलनी, हिंगणे खुर्द, सिंहगड रस्ता) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. खून करणारे युवक अल्पवयीन आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभय हा एका मिठाई विक्री दुकानात काम करतो. अल्पवयीन युवक आणि अभय एकाच भागात राहायला आहेत. दुचाकी पुढे नेण्याच्या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता. शुक्रवारी (२५ ऑक्टोबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गणेशनगर कॉलनीतील घरासमोर अभय थांबला होता. त्यावेळी अल्पवयीनांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. अल्पवयीनांनी त्याच्यावर एकापाठोपाठ तब्बल ३५ वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात घबराट उडाली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

आणखी वाचा-पिंपरी महापालिकेतील तत्कालीन लेखाधिकारी किशोर शिंगेसह पत्नीवर गुन्हा

या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी पसार झालेल्या दोघांना रात्री ताब्यात घेतले. त्यांच्याबरोबर असलेला एक साथीदार शहरातून पसार झाला आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

बाल न्याय मंडळाकडून जामीन मिळताच खून

याप्रकरणातील एका अल्पवयीनाविरुद्ध चार दिवसांपूर्वी खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात त्याला बाल न्याय मंडळात हजर करण्यात आले होते. बाल न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केल्यानंतर दोनच दिवसात त्याने खून केला. पोलीस निरीक्षक क्षीरसागर तपास करत आहेत.

आणखी वाचा-‘नाण्यां’साठी विद्यापीठाकडून लाखोंची ‘चांदी’

रस्त्यावरील वाद नित्याचे

शहरात रस्त्यावरील वाद नित्याचे झाले आहेत. किरकोळ कारणावरुन भर रस्त्यात हाणामारीच्या घटना घडतात. हडपसर भागात दोन वर्षांपूर्वी किरकोळ वादातून एका व्यावसायिक तरुणाचा कोयत्याने वार करुन खून करण्यात आला होता. बाणेर भागात एका मोटारचालकाने किरकोळ वादातून दुचाकीस्वार तरुणीला मारहाण केल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती