भरधाव दुचाकीवर हातात पिस्तुल घेऊन रिल्स बनवणाऱ्या दोघांना पिंपरी- चिंचवडच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. दहशत पसरविण्यासाठी हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे. व्हिडिओमधून एकाच्या हातात पिस्तुल असल्याचं स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडीओ कधीचा आहे हे समजू शकलेल नाही. सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. कुणाल रमेश साठे याला अटक करण्यात आली असून एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. यश कांबळे, सुशील बारक्या आणि रोहित मिश्रा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा… महापालिका आयुक्तच डेंग्यूसदृश रोगाने आजारी पडतात तेव्हा…
पिंपरी- चिंचवड शहरातील रस्त्यांवर दुचाकीवर हातात पिस्तुल घेऊन ते हवेत उंचावून रिल्स काढत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यापैकी एक आरोपी यश कांबळे हा दुचाकीवर पाठीमागे पिस्तुल हवेत उंचावत आहे. त्याचा व्हिडिओ पाठीमागे असलेल्या दुचाकीवरील तरुणांनी मोबाईलमध्ये काढला आहे. या प्रकरणी तातडीने दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींवर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिस्तुल बनावट आहे की खरं याबाबत पोलीस तपास करत आहेत. अद्याप मुख्य आरोपीचा शोध पोलीस घेत असून आरोपी पिस्तूलासह फरार आहे.