पुणे : मैत्रिणीवर वादातून चाकूने वार करून तिच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी तरुणाला जन्मठेप आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सात वर्षांपूर्वी कोथरूड भागातील त्रिमूर्ती काॅलनीत ही घटना घडली होती.
स्वप्नील रघुनाथ कुंभार (वय २८, रा. विजयनगर, कराड, जि. सातारा) असे जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. १५ जून २०१५ रोजी कुंभारने कोथरूडमधील त्रिमूर्ती काॅलनीत मैत्रिणीवर चाकूने वार केले हाेते. या घटनेत ती गंभीर जखमी झाली होती. याबाबत तरुणीच्या वडिलांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तत्कालीन पोलीस निरीक्षक अरुण ओंबासे यांनी या प्रकरणाचा तपास केला होता. या खटल्यात सरकार पक्षाकडून सरकारी वकील ॲड. प्रेमकुमार अगरवाल यांनी काम पाहिले. सरकार पक्षाकडून आठ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली होती. वैद्यकीय अधिकारी आणि तरुणीची साक्ष या खटल्यात महत्वाची ठरली.
हेही वाचा – पुणे : मनसे नेते वसंत मोरेंच्या पुढाकाराने ‘फुलराणी’ पुन्हा धावणार
न्यायालयाने साक्ष तसेच पुरावे ग्राह्य धरून कुंभारला जन्मठेप, एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास दोन वर्षे सक्तमजुरीची तरतूद न्यायालयाने निकालपत्रात केली आहे. दंडातील ४५ हजार रुपये तरुणीला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. न्यायालयीन कामकाजात पोलीस कर्मचारी विनय पानसरे यांनी सहाय्य केले.
सरकार पक्षाचा युक्तीवाद
सरकारी वकील ॲड. प्रेमकुमार अगरवाल यांनी आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची विनंती युक्तिवादात न्यायालयाकडे केली होती. आरोपी कुंभार आणि तरुणी ओळखीचे होते. तो तिच्या घरी जायचा. तो तिच्यावर प्रेम करू लागला. तिला इतरांशी बोलण्यास मनाई केली. तिच्यावर हक्क गाजवून तिचा मोबाइल संच तपासला. त्याने तरुणीवर चाकूने १८ वार केले. तरुणीचा खून करण्याचा उद्देश होता. हल्ल्यात तरुणीचे मूत्रपिंड निकामी झाले. तरुणीच्या कुटुंबीयांना उपचारासाठी मोठा खर्च करावा लागला. आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी ॲड. अगरवाल यांनी युक्तिवादात केली.