खडकीतील रेंजहिल्स भागात असलेल्या श्रीकृष्ण मंदिरातील दानपेटी फोडून रोकड लांबविणाऱ्या चोरट्याला खडकी पोलिसांनी अटक केली. जसराज उर्फ चंक्या वासुदेवन मंन्नु (वय २३, रा. खडकी) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.
हेही वाचा- नगर रस्त्यावर छायाचित्रकाराला लुटणारे चोरटे अटकेत
खडकीतील रेंजहिल्स भागात असलेल्या श्रीकृष्ण मंदिरातील दानपेटी फोडल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. या भागातील एका गॅरेजमध्ये काम करणारा जसराज हा घटना घडल्यानंतर पसार झाला होता. त्याने चोरी केल्याचा संशय पोलिसांना होता. पोलीस जसराजचा शोध घेत होते. तो रेंजहिल्स भागात आल्याची माहिती तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम यांच्या पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून जसराज याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.