पुणे : मॉडेलिंग क्षेत्रात कामाची संधी तसेच दररोज पाच ते सात हजार रुपये कमवा, अशी जाहिरात समाजमाध्यमात प्रसारित करून युवक-युवतींची फसवणूक केल्याचा प्रकार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत आरोपींनी २३ जणांकडून पैसे घेऊन त्यांची ४३ लाख ९३ हजार रूपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
हेही वाचा >>> पुणे: ढोले पाटील रस्त्यावर अतिक्रमण विभागाच्या पथकावर हल्ला प्रकरणी पाच जण अटकेत
याप्रकरणी श्रद्धा चंद्रकांत अंदुरे, योगेश मदनलाल मुंदडा (दोघे रा. छत्रपती संभाजीनगर), जय पंकज चावजी, शुभम जयप्रकाश पगारे, अनिरुद्ध बिपीन रासने (रा. कोथरुड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका युवतीने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. युवती रंगभूषाकार आहे. माॅडेलिंग क्षेत्रात कामाची संधी असल्याचे आमिष दाखविणारी जाहिरात समाजमाध्यमातून प्रसारित करण्यात आली होती. रंगभूषाकार, केशरचना, छायाचित्रकारांना माॅडेलिंग क्षेत्रात कामाची संधी असल्याचे आमिष दाखविण्यात आले होते. दररोज पाच ते सात हजार रुपये मिळतील,असे त्यांना सांगण्यात आले होते. तक्रारदार युवतीने श्रद्धा अंबुरेची भेट घेतली. तेव्हा आमच्या कंपनीला काम मिळाले आहे. त्यासाठी काही पैसे भरावे लागतात. तीन महिन्यांसाठी चार हजार ४२५ रुपये आणि दोन वर्षांसाठी १७ हजार रुपये भरावे (सबक्रिप्शन) लागतील, असे तिला सांगण्यात आले होते. त्यानंतर युवक-युवतीचा समूह तयार करण्यात आला. त्यांना द पुणे स्टुडिओ येथे बोलाविण्यात आले. २१ मार्चपासून काम सुरू होणार असल्याची बतावणी त्यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानंतर कंपनी आर्थिक अडचणीत असून काम मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तक्रार देण्यात आली. आतापर्यंत २३ जणांची ४३ लाख ९३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रार अर्ज पोलिसांकडे दाखल झाले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.