पुणे / बारामती: ‘भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने त्याला विरोध करायला हवा होता,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी अजित पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथे महायुतीच्या सभेवेळी पडळकर यांनी शरद पवार यांचा ऐकेरी उल्लेख करतानाच त्यांच्यावर कडवट टीका केली होती. या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार यांनी बारामती येथे पत्रकारांशी संवाद साधला.

हेही वाचा >>> रिंग रोडसाठी २०० हेक्टर भूसंपादन बाकी; ५०० कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी

‘विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, राजेश टोपे यांसारख्या चांगले काम करणाऱ्या नेत्यांना पराभूत व्हावे लागले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत विजय मिळविणारे पडळकर अशी विधाने करीत असतील, तर त्यांच्याकडून जनतेने काय अपेक्षा ठेवायची,’ अशी विचारणा युगेंद्र यांनी केली.

हेही वाचा >>> येरवड्यातील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला कैदी पसार

‘शरद पवार देशातील मोठे नेते आहेत. त्यांच्याबाबत सर्वांना आदर असून त्यांच्यासंदर्भात अशी विधाने करणे योग्य नाही. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि राज्यातील जनेतेलाही ते आवडणार नाही. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष महायुतीत असून, महायुतीकडे राज्यातील सत्ता आहे. त्यामुळे महायुतीतील घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादीने त्याबाबत त्यांची भूमिका मांडणे योग्य ठरले असते. या प्रकारच्या विधानांना विरोध करता आला असता,’ असे युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केले. ‘आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढवाव्या लागतील. कार्यकर्त्यांना ताकद द्यावी लागेल. पक्ष संघटना वाढवून ती मजबूत करावी लागणार असून, पक्षामध्ये स्वच्छ प्रतिमेच्या युवकांना संधी द्यावी लागेल,’ असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Story img Loader