पुणे : युवा संघर्ष यात्रा ही तरुणांना नवा विश्वास, आत्मविश्वास देणारी आहे. ही नव्या पिढीची दिंडी आहे. सत्ता हातात ठेवायची असेल तर लोकशाहीच्या मार्गाने सुरू असलेल्या या संघर्ष यात्रेकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.
युवकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात नगर जिल्ह्यातील कर्जतचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा काढली आहे. नागपूपर्यंत काढल्या जाणाऱ्या या यात्रेचा आरंभ मंगळवारी पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात झाला. यानिमित्त टिळक स्मारक मंदिरात झालेल्या सभेमध्ये पवार बोलत होते. रोहित पवार, खासदार श्रीनिवास पाटील आणि वंदना चव्हाण, शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. राज्यात सत्तापरिवर्तन व्हावे, अशी तरुणांची अपेक्षा आहे. त्याची सुरुवात संघर्ष यात्रेतून झाली आहे. यात्रेच्या माध्यमातून सत्तापरिवर्तन शक्य आहे, असे पवार या वेळी म्हणाले. या यात्रेकडे सरकारला दुर्लक्ष करता येणार नाही. विधिमंडळ ही लोकशाहीची पंढरी आहे. या विधिमंडळाचे दर्शन व्हावे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावेत, यासाठी जळगाव ते लातूर अशी दिंडी आम्ही काढली. ही युवा संघर्ष यात्रा आम्ही काढलेल्या दिंडीपेक्षाही मोठी आहे. त्यामुळे ती परिणामकारक ठरेल, असे पवार म्हणाले. युवकांना संघटित करून त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी ही यात्रा आयोजित केल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
हेही वाचा >>> राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी माफी मागावी अन्यथा ‘श्रीलंकेत’; मित्र पक्ष भाजपचा इशारा
पवार यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न
पुणे : मराठा समजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी राज्यातील वातावरण ढवळून निघाले असतानाच या मागणीसाठी पुण्यातील टिळक चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाहनांचा ताफा मराठा आंदोलकांकडून अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. आमदार रोहित पवार यांनी आयोजित केलेल्या युवा संघर्ष यात्रेनिमित्त पवार यांची टिळक स्मारक मंदिरात सभा झाली. या सभेनंतर त्यांच्या वाहनांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून वातावरण ढवळून निघाले आहे. मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नेत्यांना गावात फिरकून दिले जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका काही गावांनी घेतली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे यांनी ठोस भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
अशी असेल यात्रा
* एकूण अंतर सुमारे ८०० किलोमीटर
* ४५ दिवसांचा प्रवास
* यात्रा १३ जिल्ह्यांमधून जाणार
* नागपूर येथे यात्रेचा समारोप पुन्हा पवार यांच्या उपस्थितीत
* कंत्राटी भरती, पेपरफुटी, नागरी सेवा परीक्षासंदर्भातील निर्णय, बेरोजगारी आदी मुद्दे