पुणे : ज्या परिसरात ठोके देऊन तांब्याची भांडी घडविली जातात त्या कसबा पेठेमध्ये तब्बल चार दशकांपूर्वी तबल्याच्या ठेक्याने मोजकेच रसिक मंत्रमुग्ध झाले होते. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि कलाकारांशी सौहार्दपूर्ण संबंध असलेले काका वडके यांच्या गुरुकृपा या निवासस्थानी दत्तजयंती उत्सवामध्ये तबलानवाज उस्ताद झाकीर हुसेन यांनी केवळ हजेरीच लावली नाही, तर तबलावादनाची सेवाही रूजू केली होती.

काका वडके यांच्या निवासस्थानी होणारा दत्तजयंती सोहळा हा कसबा पेठेतील नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र असतो. ‘१९८३ मध्ये झालेल्या उत्सवात झाकीर हुसेन यांनी दर्शनासाठी हजेरी लावली होती. एवढेच नव्हे, तर आपल्या जादुई बाेटांची करामत दाखवित केलेल्या तबलावादनाने रसिकांना जिंकून घेतले होते. उस्तादजींची ही अनोखी मैफल आजही आम्ही स्मृतींच्या कोंदणात जपून ठेवली आहे,’ अशी आठवण काका वडके यांचे पुत्र रवी वडके यांनी दिली.

हेही वाचा – राज्यात प्रथमच पुण्यात होणार ‘हा’ प्रयोग! बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयाने घेतला पुढाकार

हेही वाचा – सीएनजी पंपावर गॅसचे ‘नोझल’ उडाल्याने कामगाराचा डोळा निकामी, धनकवडीतील घटना; पंप मालकासह व्यवस्थापकाविरुद्ध गु्न्हा

‘आपल्याकडील दत्तजयंती उत्सवाला झाकीर हुसेन यांनी उपस्थित राहावे, अशी काका वडके यांची इच्छा होती. उस्ताद अल्लारखाँ यांचे शिष्य आणि तबलावादक केशवराव बडगे हे काकांचे स्नेही. त्यांच्या माध्यमातून काकांनी झाकीरजींना निमंत्रण दिले होते. दत्तजयंतीच्या निमित्ताने ‘श्री गुरुकृपा’ या वास्तूमध्ये आपल्या तबल्याची जादुई सेवा उस्ताद झाकीर हुसेन यांनी दत्त महाराजांपुढे सादर केली होती. अशा थोर कलाकाराचे स्वागत करण्याची संधी आम्हा मुलांना मिळाली हे आमचे भाग्यच,’ अशी भावना रवी वडके यांनी व्यक्त केली.

Story img Loader