जेजुरी वार्ताहर :
खंडेरायाच्या जेजुरी नगरीमध्ये भरणाऱ्या पारंपारिक दसरा झेंडू बाजारामध्ये आज झेंडूला पंधरा ते वीस रुपये किलो भाव मिळाला.सोमवारी सायंकाळी तर दहा रुपये किलो दराने व्यापाऱ्यांनी झेंडूची फुले खरेदी केली. राज्याच्या विविध भागात शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड मोठ्या प्रमाणात केल्यामुळे पुणे, मुंबई सारख्या शहरात मालाची आवक जादा झाली. त्यामुळे झेंडूचे भाव पडले. जेजुरीत दोन दिवसापासून दसऱ्यानिमित्त झेंडू बाजार भरला होता, तालुक्याच्या विविध भागातून शेतकऱ्यांनी झेंडू मोठ्या प्रमाणात विक्रीस आणला, मात्र झेंडू खरेदीसाठी आलेल्या व्यापाऱ्यांची संख्या अत्यंत कमी होती,चार-पाच तास थांबूनही झेंडू खरेदीसाठी व्यापारी येत नसल्याचे पाहून कवडीमोल भावाने शेतकऱ्यांनी झेंडू विकला.
झेंडूला दहा ते पंचवीस रुपयापर्यंत भाव मिळाला. तर यलो गोल्ड जातीच्या पिवळ्या फुलांना ४० ते ६० रुपये किलोने मागणी होती.यंदा झेंडूचे पीक घेण्यासाठी आलेला खर्चही पदरात पडला नाही. झेंडू लागवडीतून तोटा झाला असे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. पूर्वी पुरंदर तालुक्यात गोंडा या झेंडूच्या जातीचे उत्पादन घेतले जायचे तालुक्यातील हवामान व जमीन झेंडू साठी योग्य असल्याने सर्वत्र झेंडू लागवड मोठ्या प्रमाणात व्हायची, दसऱ्याला दरवर्षी मोठा बाजार भरायचा परंतु आता झेंडूच्या नवीन सुधारित जातीची लागवड राज्यातील विविध भागात बागायती क्षेत्रातही केली जात असल्याने जेजुरीच्या पारंपारिक झेंडू बाजाराचे महत्व कमी झाले आहे.
अनेक व्यापारी थेट पुणे,मुंबई येथेच झेंडू खरेदी करीत असल्यामुळे जेजुरीत येऊन झेंडू खरेदी करण्याची गरज व्यापाऱ्यांना उरली नाही. दरवर्षी दसरा -दिवाळीला चार पैसे मिळवून देणारे हक्काचे पीक म्हणून येथील शेतकरी झेंडू लागवड करतात, परंतु यावेळी झेंडू मातीमोल झाल्याने झेंडू उत्पादक शेतकरी निराश झाल्याचे जाणवले.खंडेनवमी दिवशी कारखान्यामध्ये यंत्रांच्या पूजा करून ,झेंडूच्या फुलांच्या माळा बांधल्या जातात. पुणे पिंपरी चिंचवड परिसरातील कारखान्यांना झेंडू खूप लागतो ही झेंडूची फुले पुण्यातच उपलब्ध होत असल्याने जेजुरीत झेंडू खरेदीसाठी व्यापारी कमी आले.
विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरातील फुल बाजारात लगबग पाहायला मिळते आहे. दसऱ्याच्या आदल्या दिवशी झेंडू, शेवंती, अष्टर , गुलाब फुलांचे दर वाढत असतात. मात्र अहमदनगरच्या बाजारात झेंडूचे दर पडले असल्याचे पाहायला मिळत आहेत. कालपर्यंत ६० किलो दर असलेल्या झेंडूला आज १५ ते ३० रुपये किलो दर मिळतो आहे. शेवंती १०० ते २०० रुपये किलो. गुलाब ३०० ते ५०० रुपये किलो, अष्टर १२० ते १५० तर गुलछडीला २५० ते ३०० रुपये किलो दर मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केलं. यंदा अहमदनगर जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली. त्यामुळे फुलांचे नुकसान झाले नाही, परिणामी बाजारात फुलांची आवक वाढली आहे. त्यातच दसरा डोळ्यासमोर ठेऊन एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात फुलांची तोडणी केली. त्यातच बाहेरच्या जिल्ह्यातूनही फुलांची आवक झाली असल्याने दर पडल्याचे सांगण्यात आलं आहे.
धुळे जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात फुलांची आवक सुरु आहे. ही आवक नाशिक जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून होत आहे. यामुळं एकीकडे फुल उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलांना चांगला भाव मिळत असला तरी दुसरीकडे मात्र सर्वसामान्यांना फुले खरेदी करण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. राज्यातील बहुतांश शेतकरी आता पारंपारिक पिकांबरोबरच फळबागांचे उत्पादन वाढवण्यावर भर देत आहेत. यावर्षी फुल उत्पादक शेतकऱ्यांना कमी पावसाचा मोठा फटका बसला आहे. फुल शेती पिकांवर वाईट परिणाम झाल्यानं बाजारात फुलांची आवकही ३० ते ४० टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळं फुलांचे भाव वाढले आहेत. झेंडूला किलोला ८० ते १०० रुपयांचा दर मिळतो आहे.