परदेशात बीएफ.७ या विषाणूप्रकारामुळे वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विमानतळांवर दाखल होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात रविवारी एकही नवीन करोना रुग्ण आढळलेला नसल्याचे राज्याच्या साथरोग सर्वेक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. परदेशात वाढत असलेल्या बीएफ.७ रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर २४ डिसेंबरपासून राज्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
हेही वाचा >>> खराडीत कौटुंबिक वादातून जावयाला पेटवले; सासू, सासरे, पत्नीसह नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा
एक जानेवारी (रविवार) पर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर विमानतळांवर एक लाख ३६ हजार ४४७ प्रवासी आले असून, त्यांपैकी २८७५ प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. शनिवारपर्यंत या चाचणीतून करोना संसर्गाचे निदान झालेल्या प्रवाशांची संख्या सहावर पोहोचली असून त्यांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठवण्यात आले आहेत. यांपैकी तीन प्रवासी पुणे येथील, दोन नवी मुंबई येथील आणि एक प्रवासी गोवा येथील आहेत. रविवारी दिवसभरात कोणताही नवा रुग्ण आढळलेला नाही.