पुणे : शहरात झिकाच्या रुग्णसंख्येतील वाढ सुरूच असून, एकूण रुग्णांची संख्या आता १०३ वर पोहोचली आहे. रुग्णांमध्ये गर्भवतींचे प्रमाण अधिक आहे. शहरात आतापर्यंत झिकाच्या पाच रुग्णांचा मृत्यू झाला असून, तो सहव्याधींमुळे झाल्याचे समोर आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरात झिकाचे तीन नवीन रुग्ण आढळून आले आहेत. हे रुग्ण एरंडवणे क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील आहेत. त्यात १९ वर्षीय स्त्री, ६९ वर्षीय पुरूष आणि ५९ वर्षीय पुरूष अशा तिघांचा समावेश आहे. या तिघांमध्ये तापाचे लक्षण दिसून आले होते. खासगी रुग्णालयाने या रुग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत पाठविले होते. त्यांचे तपासणी अहवाल मिळाल्यानंतर महापालिकेने अखेर या रुग्णांची नोंद केली आहे.

आणखी वाचा-वारजे भागातील तोतया डाॅक्टरविरुद्ध गुन्हा, वैद्यकीय पदवी नसताना मूळव्याधीवर उपचार केंद्र

शहरातील डहाणूकर कॉलनी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत झिकाचे सर्वाधिक २० रुग्ण आहेत. त्या खालोखाल एरंडवणे क्षेत्रीय कार्यालयात १९ रुग्ण आहेत. खराडी १३, घोले रस्ता व पाषाण प्रत्येकी ९, सुखसागरनगर व मुंढवा प्रत्येकी ७, वानवडी ५, कळस ४, कोरेगाव पार्क व आंबेगाव बुद्रुक प्रत्येकी ३, लोहगाव २, विश्रामबागवाडा आणि धनकवडी प्रत्येकी १ अशी रुग्णसंख्या आहे. शहरातील एकूण १०३ रुग्णांपैकी ४५ गर्भवती आहेत, अशी माहिती महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी दिली.

शहरात झिकाच्या पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात खराडीतील ७२ वर्षीय पुरुष, पाषाणमधील ९५ वर्षीय स्त्री, बाणेरमधील ७८ वर्षीय पुरुष, कोथरूडमधील ६८ वर्षीय पुरुष आणि कर्वेनगरमधील ७६ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. हे सर्व जण ज्येष्ठ नागरिक असून, त्यांना सहव्याधी होत्या. या रुग्णांचे वैद्यकीय अहवाल राज्याच्या आरोग्य विभागाला पाठविण्यात आले होते. आरोग्य विभागाच्या मृत्यू परीक्षण समितीने या रुग्णांचा मृत्यू सहव्याधींमुळे झाल्याचे स्पष्ट केले आहे.

आणखी वाचा-पालिका आयुक्तांच्या आदेशाला कोणी दाखविली केराची टोपली

शहरातील झिकाचा प्रादुर्भाव

  • एकूण रुग्णसंख्या – १०३
  • गर्भवती रुग्ण – ४५
  • रुग्ण मृत्यू – ५
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zika cases continue to rise in pune more pregnant patients pune print news stj 05 mrj