पुणे : मुंढव्यातील कोद्रेवस्ती परिसरात झिकाचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. या रुग्णाचा खासगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवाल झिका पॉझिटिव्ह आला असून, त्याचा राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेचा तपासणी अहवाल अद्याप आरोग्य विभागाला मिळालेला नाही. पुण्यातील झिकाची रुग्णसंख्या आता तीनवर पोहोचली आहे.

एरंडवणा भागात डॉक्टर आणि त्याच्या मुलीला झिकाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता मुंढव्यातील कोद्रे वस्तीत ४७ वर्षीय महिलेला झिकाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. या महिलेला वारंवार ताप येऊ लागल्याने ती हडपसरमधील खासगी रुग्णालयात दाखल होती. तिच्या तापाचे नेमके निदान होत नसल्याने डॉक्टरांनी तिची झिकासाठी चाचणी केली. या महिलेचा खासगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तिचा रक्त नमुना तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत पाठविण्यात आला असून, त्याचा तपासणी अहवाल अद्याप आरोग्य विभागाला मिळालेला नाही.

हेही वाचा >>>‘एल थ्री’ बारमधील पार्टीत मुंबईतून मेफेड्रोनचा पुरवठा; संगणक अभियंता तरुणासह दोघे अटकेत

या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. प्रतापसिंह सारणीकर यांनी महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांना पत्र पाठविले आहे. या पत्रात म्हटले आहे की, महापालिकेच्या हद्दीत झिकाचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. त्याठिकाणी आरोग्य विभागाच्या कीटकशास्त्रीय पथकाने तपासणी केली आहे. रुग्ण आढळलेल्या परिसरात महापालिकेने ताप रुग्णांचे सर्वेक्षण सुरू करावे. याचबरोबर त्या परिसरात सकाळी ८ ते १० आणि संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी.

झिका रुग्ण आढळून आलेल्या परिसरातील ताप रुग्णांचे रक्त नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यास महापालिकेला सांगण्यात आले आहे. याचबरोबर त्या परिसरातील गर्भवतींची नोद करून त्यांची ३ महिन्यांतून एकदा सोनोग्राफी करण्याच्याही सूचना केल्या आहेत.- डॉ. प्रतापसिंह सारणीकर, सहाय्यक संचालक, आरोग्य विभाग